सिलिंडरच्या बहाण्याने एजन्सीत तिघे आले अन् पैसे घेऊन पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 02:18 PM2022-09-24T14:18:14+5:302022-09-24T14:19:12+5:30
इन्डेन गॅस एजन्सीतील प्रकार : हातचलाखीने पळविले ११ हजार
वर्धा : अचानक तिघे कारमधून आले. मुख्य मार्गावर कार उभी करून ठाकरे मार्केट परिसरातील सिलिंडर मागण्याच्या बहाण्याने इंण्डेन गॅस एजन्सीमध्ये गेले तेथे इंग्रजीमध्ये संभाषण करून महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करुन ११ हजार १६० रुपये लंपास केले. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली असून सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
शहरातील ठाकरे मार्केट परिसरात इण्डेन गॅस एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये कर्मचाऱ्यांचे नियमित कामकाज सुरु होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती या एजन्सीमध्ये गेल्या. त्यांनी इंग्रजीमध्ये संभाषण करत आम्ही विदेशातून आल्याने आम्हाला सिलिंडर हवे आहे. यासोबतच करन्सी बदलवून घ्यायची असल्याने ते कुठे मिळेल, अशी चौकशी केली. दरम्यान, एजन्सीत काम करणारी एक मुलगी पैशांचा हिशेब करत होती तेवढ्यात तिघांपैकी एक व्यक्ती तिच्या जवळ गेला. त्याने शंभरच्या ५ नोटा देऊन ५०० च्या नोटेची मागणी केली. याच दरम्यान तिच्या हातातील नोटांचे बंडल आपल्या हातात घेऊन हातचलाखीने पैसे घेऊन पोबारा केला. हिशेब जुळत नसल्याचे लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
त्यामुळे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये सर्व काही उघडकीस आल्यावर एजन्सीचे संचालक शरद सराफ यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने दिलेल्या शंभरच्या नोटांना उग्र वास असल्याचे दिसून आले. हे तिन्ही आरोपी ज्या कारने शहरात आले होते, त्या कारचा क्रमांकही विचित्रच लिहिला होता. त्यामुळे या आरोपींच्या तातडीने मुसक्या आवळण्याची गरज आहे.