तीन अल्पवयीन चोरटे सेवाग्राम पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: April 10, 2015 01:43 AM2015-04-10T01:43:51+5:302015-04-10T01:43:51+5:30
सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या परिसरातील लिंगराज बोरांग जेना यांच्या घरी चोरी झाली होती.
वर्धा : सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या परिसरातील लिंगराज बोरांग जेना यांच्या घरी चोरी झाली होती. यात चोरट्यांनी एकूण ६१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या चोरीचा छडा लावण्यात सेवाग्राम पोलिसांना यश आले असून ही चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून गुरुवारी एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सुत्रानुसार, सोमवारी जेना यांच्याघरी चोरी झाली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून लॅपटॉप, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मोबाईल, दोन पेनड्राईव्ह, एक हार्डडिस्क व रोख २ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी सेवाग्राम ठाण्यात भादंविच्या ४५४, ३८० व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास सुरू असताना सेवाग्राम पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याजवळून चोरीतील ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चोरीतील हार्डडिस्क व दोन पेनड्राईव्ह जेना यांच्या घरीच मिळून आले. तर एक अंगठी चोरट्यांच्या हातून गहाळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात जामदार नरेंद्र डहाके, प्रदीप राऊत, संघर्षसेन कांबळे, नवनाथ मुंढे व विलास अवचट यांनी केली.(प्रतिनिधी)