जिल्ह्यात तीन नवे राष्ट्रीय महामार्ग
By Admin | Published: January 22, 2017 12:24 AM2017-01-22T00:24:34+5:302017-01-22T00:24:34+5:30
संपूर्ण भारतात रस्ते विकासाच्या व महामार्ग निर्मितीच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे.
अधिसूचना जारी : अनेक महत्त्वाचे रस्ते केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली
वर्धा : संपूर्ण भारतात रस्ते विकासाच्या व महामार्ग निर्मितीच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. वर्धा जिल्ह्यालाही तीन नवीन राष्ट्रीय महामार्ग प्राप्त झाले आहेत. याबाबतची अधिसूचना केंद्र शासनाकडून ३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नवीन महामार्गांमुळे वर्धा बाजारपेठेला मोठा फायदा होणार असून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
केंद्राद्वारे जाहीर या अधिसूचनेनुसार काही रस्ते राष्ट्रीय मार्ग म्हणूनही घोषित करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. ३४७ अ हा नवीन महामार्ग मध्यप्रदेश राज्यातील मुलताई येथून प्रारंभ होणार असून वर्धा लोकसभेतील वरूड-आष्टी-आर्वी-पुलगाव-वर्धा-हिंगणघाट-जाम आणि राष्ट्रीय महामार्ग ९३० वरोराजवळ समाप्त होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ ब हा नवीन महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथून प्रारंभ होणार आहे. तो राळेगावमार्गे वर्धा जिल्ह्यातील कापसी-सिरसगाव-वडनेर येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वडकीजवळ समाप्त होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३४३ आय हा औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला नवीन महामार्ग आहे. तो नागपूर जिल्ह्यातील हिंगणा टी-पार्इंटला थेट वर्धा शहराशी जोडणार आहे. या मार्गामुळे नागपूरला जाण्याकरिता वर्धेकरांना एक पर्यायी रस्ताही भविष्यात उपलब्ध होणार आहे. हा नवीन महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ५३ वाडी येथून प्रारंभ होणार असून हिंगणा-इसासनी-मिहान-नागपूर आऊटर रिंगरोड-गुमगाव-सालई धाबा- बुट्टीबोरी एमआयडीसी- टाकळघाट- कापरी, मोरेश्वर-आसोला-वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ड्रायपोर्ट-कांढळी-हमदापूर-खरांगणा गोडे-सेवाग्राम येथून पवनारजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ जवळ समाप्त होणार आहे.
नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गाचा ताबा भविष्यात प्रशासकीय व तांत्रिक प्रकिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत होणार आहे. यापूढील देखभाल, दुरूस्ती, रूंदीकरण, सिमेंटीकरण, विस्तारीकरण, दरम्यान येणाऱ्या सर्व पुलांचे बांधकाम केंद्रीय रस्ते परिहवन मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत पूर्ण केले जाणार आहे. हे महामार्ग विकासाचे द्योतक ठरणार आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
मार्गातील शहरांसह ग्रामीण भागाच्या विकासाची वाट मोकळी
शहर, गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने रत्यांच्या निर्मितीला महत्त्वाचे स्थान असते. रस्त्यांची निर्मिती झाली की, गावे शहरांशी जोडली जातात आणि यातून उद्योग, व्यवसाय आणि अन्य घटकांमध्येही विकासाची बिजे रोवली जातात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रस्ते विकासासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
वर्धा जिल्ह्याला नवीन तीन राष्ट्रीय महामार्ग मिळणार असल्याने त्या मार्गातील शहरांसह गावांच्या विकासाची वाट मोकळी होणार आहे. नागपूर, मुलताई, वर्धा ही प्रमुख शहरे एकमेकांशी जोडली जाणार असून ग्रामीण भागही शहरांच्या संपर्कात येणार आहेत. यातून विकासाचे विविध मार्ग गवसणार असल्याने नवीन राष्ट्रीय महामार्ग जिल्हा विकासाला चालना देणारे साधन ठरणार आहे.
३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार वर्धा जिल्ह्याला तीन नवीन महामार्ग प्राप्त झाले आहेत. वेळोवेळी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाल्याने वर्धा लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून मी अत्यंत समाधानी आहे. वर्धा जिल्ह्याला न भुतो, अशी भेट केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे प्राप्त झाली आहे. गडकरी यांची दूरदृष्टी व विकासाबद्दलची आस्था यातून जनतेला दिसून येते. येणाऱ्या काळात वर्धा व नागपूर तसेच मध्यप्रदेशातील मुलताई ते वर्धा हे प्रमुख शहरे चांगल्या रस्त्यांनी जोडली जाणार असून याचा फायदा वर्धेतील बाजारपेठेला व शेतकऱ्यांना होईल.
- रामदास तडस, खासदार, वर्धा.