सेल्फीचा नाद भोवला; झुल्यावरुन पडल्याने तीन जण गंभीर
By चैतन्य जोशी | Published: April 6, 2023 11:51 AM2023-04-06T11:51:10+5:302023-04-06T11:58:14+5:30
घोराडच्या यात्रा महोत्सवातील घटना : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
वर्धा : झुल्याच्या टोकावर सेल्फी काढण्याचा नाद काही युवकांना चांगलाच भोवला असून तीन जण गंभीर जखमी झाले तर काहींना किरकोळ जखमा झाल्या. ही घटना सेलू तालुक्यातील घोराड गावात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.चेतन राजू निमजे रा. घोराड, अंकीत संजय पराते रा. सेलू तसेच टाकळघाट येथील एका युवकाचा जखमींमध्ये समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, घोराड गावात सध्या यात्रा सुरु आहे. यात्रेत आकाशपाळणा, ड्रॅगन झुला व इतर मनोरंजनात्मक साहित्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही यात्रा दरवर्षीच नागरिकांसाठी आकर्षण ठरते. काही युवक यात्रेतील ड्रॅगन झुल्याच्या टोकावर उभे राहून सेल्फी काढत असतानाच अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली जमिनीवर कोसळले. दरम्यान यात्रेचा आनंद घेण्यासाठी उभ्या असलेल्या काही नागरिकांवर ते सर्व मुले पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
या दुर्घटनेत घोराड येथील रहिवासी चेतन राजू निमजे याच्या हाताची नस फाटली तसेच हड्डी देखील टिचकली. त्याला सेवाग्राम व त्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. टाकळघाट येथील युवकाच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याने त्यालाही नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या सेलूच्या अंकीत परातेय याच्या अंगावर ते चारही युवक पडल्याने त्याच्या मांडीच्या हड्डीचे दोन तुकडे झाले. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.