वर्ध्यात सीसीटीव्हीमुळे तीन दुचाकी चोरटे जेरबंद; १८ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:25 PM2018-03-16T14:25:59+5:302018-03-16T14:26:10+5:30
तीन अट्टल दुचाकी चोरांना सावंगी (मेघे) पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तीन अट्टल दुचाकी चोरांना सावंगी (मेघे) पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. वर्धा शहरातील न्यू इंग्लिश शाळेजवळून दुचाकी चोरताना एक तरु ण सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याच चित्रिकरणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
पंकज उर्फ गोलू सुर्यवंशी (२५), आकाश चव्हाण (२०) व मयूर सोळंकी (२२) सर्व रा. अमरावती, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दुचाकी चोरी करताना पंकज सुर्यवंशी हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. सदर चित्रीकरण पोलिसांना मिळताच तपासाला गती देण्यात आली. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे सर्व प्रथम पोलिसांनी पंकजला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. त्यावरून आकाश चव्हाण व मयुर सोळंकी यालाही अटक करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तीनही चोरट्यांविरु द्ध यापूर्वी चोरीचे कुठलेही गुन्हे दाखल नसले तरी त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सदर तीनही तरु ण अट्टल चोरटे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, रामदास बिसणे, संघसेन कांबळे, प्रदीप राऊत, विकास अवचट, प्रविण मुंडे आदींनी केली.