आरटीओतील तीनही दलालांची जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:23 AM2018-11-15T00:23:27+5:302018-11-15T00:24:43+5:30
येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली. तसेच कार्यालय परिसरातही धावपळ उडाली होती. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले तर एकाला फरार दाखविण्यात आले आहे. ज्या तिघांना अटक करण्यात आली त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
स्थानिक प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळावर असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांनी शिकाऊ अनुज्ञप्ती विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात धाड टाकली. त्यात पाच जणांना ताब्यात घेवून चौकशी सुरु केली. चौकशीअंती दोघांना सोडण्यात आले. तर एजंट सुभाष कदम रा. गोंडप्लॉट वर्धा, दिवाकर नागोसे रा. सिंदी (मेघे) व भाष्कर बुटले रा. आष्टी (शहीद) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८ व आर डब्ल्यू. १२० बीपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तर गजानन रघाटाटे रा. रामनगर हा फरार झाल्याचे सांगण्यात आले. या तिघांनाही शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर पोलीस कचेरीतूनच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांच्यासह वर्धा गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी केली.
२३ वर्षानंतर दक्षता विभागाला आली जाग
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रतापनगर परिसरात असताना २३ वर्षांपूर्वी दक्षता विभागाने छापा टाकून चौकशी केली होती. तेव्हापासून दक्षता विभागाने या कार्यालयाकडे लक्ष दिले नाही. आता सहायक पोलीस आयुक्त प्रशांत कोलवाडकर यांनी ६ आक्टोंबरला दक्षता विभागाचा पदभार स्विकारताच आरटीओ कार्यालयावर धाड टाकून वचक निर्माण केला आहे. विशेषत: कोलवाडकर यांनी यापूर्वी वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील खाचखळग्याचीही माहिती आहे.
आजच्या कारवाईचा अहवाल प्रशासकीय कारवाईकरिता परिवहन आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. तसेच तीन अहवाल आरटीओ नागपूर व मुंबई येथे पाठविण्यात येईल. त्यामुळे परिवहन विभागाकडून योग्य ती कारवाई वर्ध्याच्या उपप्रादेशिक परिवहन विभागावर होईल.
- प्रशांत कोलवाडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, (दक्षता ) विभाग परिवहन आयुक्त कार्यालय,मुंबई.