एकाच वेळी तीन दुकानांवर मारला छापा; १२.२३ लाखांचा गुटखा जप्त
By चैतन्य जोशी | Published: March 21, 2023 05:06 PM2023-03-21T17:06:25+5:302023-03-21T17:06:49+5:30
क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई : अन्न व औषध प्रशासनाने मुद्देमाल केला जप्त
वर्धा : शहरात एकाच रात्री तीन विविध पथकाने केलेल्या कारवाईत तीन दुकानांवर छापा मारुन तब्बल १२ लाख २३ हजार २११ रुपयांचा सुगंधीत तंबाखू (गुटखा) जप्त करीत तिघांविरुद्ध शहर पोलिसात अन्न व औषध विभागाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या देखरेखीत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स पथकाने २० रोजी रात्रीच्या सुमारास केली. जितेंद्र रुपचंद भाटीया, राहूल जगदीश भाटीया, धर्मदास भाटीया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
आरोपी जितेंद्र भाटीया व त्याचे नातेवाईक शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन विविध ठिकाणाहून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची साठवणूक करुन त्याची शहरातील विविध पानटपरी व इतर ठिकाणी तसेच जिल्ह्यात विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना मिळाली होती. दरम्यान क्राईम इंटेलिजन्स पथकाच्या चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. चारही टिमने आरोपी जितेंद्र भाटीया याच्या गोदामाची माहिती काढली. पथकांना चार पैकी तीन गोदामात सुगंधीत तंबाखू गुटखा साठवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला याची माहिती देत पोलिसांसोबत छापा मारण्याबाबत आदेश दिले. अन्न व औषध प्रशासनासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी जितेंद्र भाटीया, राहूल भाटीया, धर्मदास भाटीया यांच्या मालकीचे बडे चौकात असलेले प्रिया ट्रेडर्स तसेच मोहता मार्केट परिसरात असलेले मनोज ट्रेडर्स आणि एम.के. गोदाम या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा मारला.
पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने मारलेल्या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याचे दिसून आले. तसेच विविध कंपन्यांचा सुगंधीत तंबाखू साठा मिळून आला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करुन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबोळकर, सागर भोसले, मिथुन जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्शल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल वानखेडे यांनी तसेच अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत वाणे यांच्या मार्गदर्शनात किरण गेडाम, अमित तृपकाने, संजय धकाते, रमन बावणे यांनी संयुक्तरित्या केली.