कंपनी प्रशासनाविरोधात तीन कामगारांचे बेमुदत उपोषण

By admin | Published: April 11, 2016 02:16 AM2016-04-11T02:16:30+5:302016-04-11T02:16:30+5:30

येथील सुगुणा फूड्स कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत ....

Three workers' indefinite fasting against company administration | कंपनी प्रशासनाविरोधात तीन कामगारांचे बेमुदत उपोषण

कंपनी प्रशासनाविरोधात तीन कामगारांचे बेमुदत उपोषण

Next

हिंगणघाट येथील कंपनी : भेदभावपूर्ण व्यवहाराचा आरोप
हिंगणघाट : येथील सुगुणा फूड्स कंपनीतील कामगारांवर व्यवस्थापनाकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत तीन कामगारांनी शनिवारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यात नंदकिशोर काळे, दामोधर वंजारी आणि चेतन पिसे या कामगारांचा समावेश आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवय आहे.
कामगारांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार, सुगुणा कंपनीचे व्यवस्थापन आणि कंत्राटदार यांच्यातील हितसंबंधामुळे कामगारांशी भेदभावपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनास विचारल्यास संबंधित कामगारांवर कारवाईची बडगा उगारण्यात येत होता. या प्रकाराला कंटाळून कामगारांनी संघटना बनविण्याचे ठरविले. याबाबत व्यवस्थापनाला माहिती मिळताच त्यांनी संघटना संपविण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू केली.
व्यवस्थापनाने संघटनेचे पदाधिकारी आणि काही सदस्यांना राजीनामा देण्यास सांगितले. कामगारांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने त्यांना दुसऱ्या राज्यात बदली करण्याची धमकी देण्यात आली, असे कामगारांचे म्हणणे आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांची बदली करून संघटना संपविण्याचा बेकायदेशीर डाव रचण्यात आल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची लेखी व तोंडी तक्रार कामगारांनी मागील तीन महिन्यांपासून अप्पर कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त यांच्यासह शासनाच्या सर्वच संबंधित यंत्रणेकडे केली; परंतु अधिकाऱ्यांनी कामगारांच्या तक्रारीची साधी दखलही घेतली नाही. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या कामगारांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. न्याय मिळेपर्यंत कायदेशीर मार्गाने लढा कायम ठेवण्याचा निर्धार कामगारांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला आहे.
कामगारांच्या या उपोषण मंडपाला किसान अधिकार अभियानाचे तालुका अध्यक्ष प्रवीण उपासे, धनंजय बकाणे, आम आदमी पक्षाचे मनोज रूपारेल, जगदीश शुक्ला, प्रहारचे गजू कुबडे यांनी भेट दिली.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Three workers' indefinite fasting against company administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.