तीन वर्षांत ३.२ लाख वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:34 PM2019-07-22T22:34:46+5:302019-07-22T22:35:07+5:30
वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी दिल्याचे वास्तव आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वृक्षलागवड उपक्रमाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून पावसाळ्याच्या सुरुवातीला वनविभागाकडून वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी याच वनविभागाने मागील ३ वर्षांत तब्बल ३ लाख २ हजार डेरेदार वृक्ष तोडण्याची रितसर परवानगी दिल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, वर्धा जिल्ह्यातून जात असलेल्या दोन महामार्गांसाठी सुमारे १८ हजार वृक्ष तोडण्यात आले. मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे याचा विपरीत परिणाम जिल्ह्याच्या वातावरणावर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्याची गरज आहे.
मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. कधी नव्हे, एवढ्या भीषण जलसंकटाला वर्धेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात तोंड द्यावे लागले. तर पावसाळा सुरू होऊन एक महिना २२ दिवसांचा कालावधी लोटूनही जिल्ह्यात नाममात्रच पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीसह विविध जलाशयांच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हे महत्त्वाचेच आहेत. परिणामी, प्रत्येकाने एक रोपटे लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे सांगण्यात येते. परंतु, गत तीन वर्षांत तब्बल ३.२ लाख डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याने याचा विपरीत परिणामच महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यावर होत आहेत. भविष्यातील संकट लक्षात घेत वृक्षारोपण आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे लावण्यात आलेली रोपटी जगविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आज गरजेचे आहे.
५१.३ लाख रोपटे लावल्याचा केला जातोय गाजावाजा
२ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात ७.६५ लाख, ४ कोटी वृक्षलागवड अंतर्गत १२.३८ लाख तर मागीलवर्षी ३१ लाख रोपटे वर्धा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लावण्यात आल्याचे आणि या झाडांपैकी ८५ टक्के रोपटे सध्या जिवंत असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी प्रत्यक्षात किती रोपटे उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि उन्हाचा मारा सहन केल्यानंतर सध्या जिवंत आहेत, हा खरा संशोधनाचा विषय ठरत आहे.
वृक्ष हे पाणी अडविणे आणि जिरविण्याचे महत्त्वाचे काम करते. मनुष्याला शुद्ध प्राणवायू देते. परंतु, मागील अनेक वर्षांपासून वृक्षतोड होत आहे. सध्या वृक्षारोपणाला महत्त्व दिले जात असले तरी प्रत्यक्षात वृक्षसंवर्धनासाठी भरीव कार्य होणे ही काळाची गरज आहे. लावण्यात आलेल्या रोपट्यांचे कमीत कमी दहा वर्ष संगोपन झाले पाहिजे. शिवाय, शासनानेही वृक्षारोपणासह वृक्षांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली पाहिजे.
- मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा.
वर्धा जिल्ह्यातून दोन मोठे महामार्ग जात आहेत. विदर्भाच्या विकासासाठी हे महामार्ग आवश्यक आहेत. विकासाला विरोध नाही. परंतु, याच दोन महामार्गांसाठी सुमारे १८ हजार डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याची माहिती माहिती अधिकाराचा वापर केल्यानंतर उघडकीस आली आहे. विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड कशी थांबविता येईल, यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे.
- ताराचंद चौबे, ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.