आधी दगडाने ठेचले नंतर कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:55 AM2023-11-06T11:55:47+5:302023-11-06T11:58:26+5:30

हिंगणघाटात थरार, जुन्या वादातून घटना : चारही आरोपींना ठोकल्या बेड्या

Thrill at Hinganghat; A youth was hacked to death by an ax due to an old dispute, four accused were arrested | आधी दगडाने ठेचले नंतर कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले

आधी दगडाने ठेचले नंतर कुऱ्हाडीने घाव घालून ठार केले

हिंगणघाट (वर्धा) : जुन्या वादाचा वचपा काढत तरुणावर चौघांनी जीवघेणा हल्ला चढवून कुऱ्हाडीने सपासप वार करीत त्याची हत्या केल्याची घटना शहरातील शास्त्री वॉर्ड येथील किसन जिनिंग समोरील रस्त्यावर ४ रोजी रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणातील दोन आरोपींना काल रात्री तर दोघांना आज ५ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीकांत उर्फ गजू श्रावण खंगार (३३ रा. मुजुमदार वॉर्ड) असे मृतकाचे नाव आहे. मृतक श्रीकांत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर विविध प्रतिबंधात्मक कारवाई देखील पोलिसांकडून यापूर्वी करण्यात आल्या होत्या. काही महिन्यापूर्वी तो एका गंभीर गुन्ह्यातून तुरुंगातून बाहेर आला होता. मुजुमदार वाॅर्डातील गंगा माता मंदिर परिसरातील नागरिकांनाही तो त्रास द्यायचा.

४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपी मयूर सदाशिव कोराटे(२५), बंटी उर्फ लाल्या गजानन खडसे (२४), सचिन छत्रीया (२०), प्रशांत उर्फ गोलू राऊत यांचा मृतक गजूसोबत वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन चौघाही आरोपींनी मृतक गजू याला दगडाने व कुऱ्हाडीने मारहाण करून डोक्यावर कुऱ्हाड व दगडाने वार करून त्याचे डोके ठेचले. यामध्ये श्रीकांत उर्फ गजू खंगार याचा जागीच मृत्यू झाला.

याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्याकडून तपास सुरू आहे.

Web Title: Thrill at Hinganghat; A youth was hacked to death by an ax due to an old dispute, four accused were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.