शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तन शक्य
By Admin | Published: June 26, 2014 11:28 PM2014-06-26T23:28:35+5:302014-06-26T23:28:35+5:30
शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे
वर्धा : शिक्षणामुळेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होवून शकते यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून होणारे मानसिक परिवर्तनच सामाजिक परिवर्तन घडवून आणेल. हा छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दलित मित्र एम.एन कासारे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कासारे बोलत होते.
समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संजय भागवत, बांधकाम सभापती गोपाल कालोकर, जिल्हा माहिती अधिकारी, अनिल गडेकर, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जया राऊत उपस्थित होत्या. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून छत्रपती शाहू महराजांनी विविध योजनांची आखणी केल्याचे सांगताना एम.एन.कासारे म्हणाले, समाजातील जातीभेद नष्ट करून प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला. आणि सामाजिक न्याय मिळवून दिला. समाजाचे प्रश्न सोडविताना विकासाची समान संधी दिली. त्यामुळेच सामाजिक व आर्थिक विकास शक्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना वंचितापर्यंत पोहचवून त्यांना त्यांचा लाभ मिळावा यासाठी समाजानेही पुढाकार घ्यावा. अपंग अथवा महिलांना समान संधी मिळावी त्यांना त्याचे हक्क मिळावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. गोपाल कालेकर यांनीही सामाजिक न्याय हा सर्वांना समान असावा आणि समाजातील वंचितांचे प्रश्न सुटावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी सामाजिक न्याय दिनाचे दीप प्रज्वलीत करून उद्घाटन केले. तसेच छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.
यावेळी शालांत परीक्षेत प्रावीण्य मिळविल्याबद्दल गर्ल्स हायस्कूल आंजी येथील प्रगती विजय झपाटे, समीक्षा दीपक भगत, अमर दिनकर कोयरे, शिवानी सुधाकर गायकवाड, तसेच बारावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी मोनिका घडे, गजानन नेहरे, प्रणाली कांबळे, सोनाली ककुर्ले, प्राची पाटील यांचा अतिथींच्या हस्ते रोख व स्मृतिचिन्ह देवूून गौरव करण्यात आला.(प्रतिनिधी)