‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या माध्यमातून 8 हजार 356 व्यक्ती झाल्या लसवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 05:00 AM2022-06-15T05:00:00+5:302022-06-15T05:00:02+5:30
कोविड लसीकरणाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने १ जून पासून गाव पातळीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्याने वर्ध्याचा आरोग्य विभागही नव्या जोमाने या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करीत आहे. या मोहिमेदरम्यान वर्ध्यात मागील १३ दिवसांत ५० हजारहून अधिक गृहभेटी पूर्ण करून ८ हजार ३५६ व्यक्तिंना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात सद्यस्थितीत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लसीकरणाच्या जोरावरच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा वर्धा जिल्ह्याने प्रभावीपणे मुकाबला केल्याचे वास्तव असतानाच कोविडची चौथी लाट आता वर्धा जिल्ह्यावर ओढावू पाहात आहे. अशातच कोविड लसीकरणाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने १ जून पासून गाव पातळीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्याने वर्ध्याचा आरोग्य विभागही नव्या जोमाने या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करीत आहे. या मोहिमेदरम्यान वर्ध्यात मागील १३ दिवसांत ५० हजारहून अधिक गृहभेटी पूर्ण करून ८ हजार ३५६ व्यक्तिंना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात सद्यस्थितीत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आणि गाव पातळीवर ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे का, यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
शहरी अन् ग्रामीण भागात १०५ चमू देताहेत गृहभेटी
- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘हर घर दस्तक’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तब्बल १०५ चमू तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चमू प्रत्येक दिवशी किमान ५० घरांना भेटी देऊन नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे महत्त्व पटवून देत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक चमूने प्रत्येक दिवशी किती गृहभेटी देत व्हॅक्सिनेशन केले, याचा दैनंदिन अहवाल वरिष्ठांना सादर केला जात आहे.
‘ऑन द स्पॉट’ केले जातेय ‘व्हॅक्सिनेशन’
- ‘हर घर दस्तक मोहीम’ची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण १०५ चमू तयार करण्यात आले आहेत. गृहभेटी देणाऱ्या या प्रत्येक चमूकडे कोविड लसीचा किमान ५० डोसचा साठा असून, लाभार्थ्याने लस घेण्यास होकार दर्शविताच ऑन द स्पॉट लसीकरण केले जात आहे.