मदन उन्नई भागविणार वर्धेकरांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:07 PM2018-12-13T22:07:04+5:302018-12-13T22:07:31+5:30
वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पाहणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पाहणी केली आहे.
वर्धा शहर व शहरालगतच्या अकरा गावांना धाम नदीतूनच पाणी पुरवठा केल्या जातो. यावर्षी समाधानकारक पाऊन पडला नसल्यामुळे धाम नदीने तळ गाठले आहे. तसेच धाम नदीचे काचनूर, कासारखेडा भागात खोलीकरण केल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाला. परिणामी नदीतील जलसाठा संपल्याने शहरासह अकरा गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. शहराला सध्या तीन दिवसाआड तर कधी चार दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातच सहन कराव्या लागत आहे. पाणी प्रश्न पेटण्यापूर्वी यावर तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु केल्या आहे. गुरुवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी धाम नदीत कुठे पाणी सोडता येऊ शकते, त्या स्थळांची पाहणी केली. मदन उन्नई धरणातील पाणी उजव्या कालव्यात सोडणार असून येळाकेळी येथील कालव्यातून ते पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाली मार्गे नदीत सोडण्यात येणार आहे. त्याकरिता नाली साफसफाईच्या कामाला गती देणार असून येत्या काही दिवसांत धाम नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. या माहितीला कनिष्ठ अभियंता लोखंडे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता वर्धेकरांसह परिसरातील नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे.
पुलाच्या बांधकामामुळे पाणी सोडणे अशक्य
खरांगणा ते मासोद मार्गावरील धाम नदीचा पूल खचल्याने पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे महाकाळी धरणातून पाणी सोडणे शक्य होत नसल्याने मदन उन्नई धरणाचा पर्याय निवडला आहे.
मदन उन्नई धरण यावर्षी कोरडेच होते. पण मदना धरणातून पाणी सोडल्याने जलसाठा वाढला. पॉवर कंपनी सुध्दा मोठ्या प्रमाणात मयार्देपेक्षा जास्त पाणी उपसा करीत असून मदना धरणाचा जलसाठा किती महिने टिकेल, हे येणारा काळच सांगेल.
खंड पडणार पण पाणी मिळणार : जिल्हाधिकारी
पावसाने पाठ फिरविल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.परंतू नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. पावसाळा लागण्यापूर्वी पाणी मिळावी अशी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा करण्यात थोडा खंड पडेल पण सर्वांनाच पाणी मिळेल,असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.