तांब्याची तार चोरणारी टोळी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:46 PM2019-03-14T23:46:26+5:302019-03-14T23:46:52+5:30
ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची कॉईल चोरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांब्याची कॉईल चोरी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास बेड्या ठोेकून टोळीचा पर्दाफाश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची कॉईल चोरण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांब्याची कॉईल चोरी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास बेड्या ठोेकून टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
आझाद फारुखी मोहम्मद जुबेर फारुखी (२४) रा. बस्ती (उत्तरप्रदेश), हल्ली मुक्काम कामठी रोड, नागपूर असे टोळी प्रमुखाचे नाव आहे. त्यासोबतच त्याचा साथीदार तन्वीर साजिद अन्सारी (२७) रा. मोमीनपुरा, नागपूर व चोरीतील माल विकत घेणारा उमेश साहू रा.नागपूर या तिघांना पोलिसांनी अटक केली. प्रमुख आरोपी तांब्याच्या कॉईल चोरीत पारंगत असून त्याच्यावर २०१६ मध्ये नागपूर एमआयडीसी परिसरात चोरीचे ७ गुन्हे दाखल आहे. आरोपीला पोलिसी हिसका दाखवताच त्याने वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू व देवळी हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांच्याकडून एमएच ३१ सीएन ८६५१ व एमएच ३१ सीएस १०८२ क्रमांकाच्या दोन वाहनासह तांब्याची तार व साहित्य असा एकूण ४ लाख ३ हजार ८२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
आझाद द्यायचा सहा हजार
टोळीप्रमुख आझाद फारुखी याने तनविर साजिद अन्सारी (२७) रा. मोमीनपुरा, विष्णू चौरसिया रा. माजरी, दिलदार फारुखी, रा. हिंगणा रोड, अशोक राजपूत , रा. छपरा, कपील देव रा.पटणा आदींची टोळी तयार केली होती. टोळीतील युवकांना तो दरमहा ६ हजार रुपये वेतन देत होता. सर्व युवक व्यसनाधीन असल्याने पैशाकरिता त्यांनी चोरीलाच आपला व्यवसाय बनविला. ही कारवाई स्था.गु.शाखेचे पंकज पवार, प्रमोद जांभूळकर, दीपक जाधव, सलाम कुरेशी, स्वप्निल भारद्वाज,अक्षय राऊत,आशिष महेशगौरी,रामकृष्ण इंगळे,हितेंद्र परतेकी,संजय बोगा,तुषार भुते, जगदीश डफ,कुणाल हिवसे,मुकेश येल्ले,आत्माराम भोयर यांनी केली.