म्हातारपणात उमटेना अंगठ्याचे ठसे; आधार अपडेट करायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 06:49 PM2024-06-28T18:49:30+5:302024-06-28T18:50:02+5:30

वृद्धांकडून व्यक्त होतोय संताप : जन्माचा दाखला आणायचा कुठून?

Thumbprints do not appear in old age; How to Update Aadhaar? | म्हातारपणात उमटेना अंगठ्याचे ठसे; आधार अपडेट करायचे कसे?

Thumbprints do not appear in old age; How to Update Aadhaar?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी वृद्धांना आधार कार्ड अपडेट करावे लागत आहे. यासाठी जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, बहुतांश वृद्धांकडे जन्माचा दाखला नसल्याने आधार अपडेट करणे सध्या तरी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. 
 

जन्माची नोंदच नसल्याने शाळा सोडल्याचा दाखल ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे. म्हातारपणात आता जन्माचा दाखल आणायचा कुठून असा प्रश्न वृद्धांकडून विचारला जात आहे. आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आता विविध शासकीय योजनांसोबत इतरही अनेक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे मानले जाते. याशिवाय कोणतेही काम होत नाही. विशेष म्हणजे, पूर्वी अनेकांचे आधार कार्ड तयार करताना बऱ्याच त्रुटी आहेत. त्यामुळे कार्डधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


आता आधार कार्डमध्ये फेरबदल करताना कार्डधारकांना त्रास होत आहे. अपडेट करताना जन्माचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला देणे आवश्यक आहे. अंगठ्याचे ठसे उमटत नसल्यानेही लाभार्थ्यांची अडचण वाढली आहे.


जुन्या नोंदीच नाहीत
• पूर्वी ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे माहिलांची प्रसूती घरीच होत होती. त्यावेळेस जन्माच्या नोंदीला फार महत्त्व दिल्या जात नव्हते.
• जन्माच्या नोंदी न केल्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांकडे जन्माचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे सध्या लाभार्थीची मोठी अडचण होत आहे.
• आधार कार्ड अपडेट करताना ज्येष्ठ नागरिकांकडे वयाचा पुरावा नसतो. त्यामुळे अशा वृद्धांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी केली जात आहे.


शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची वेळ
शासकीय कामात मुख्य पुरावा म्हणून आधार कार्ड द्यावे लागते. त्यात शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असल्यास आधार कार्ड आवश्यकच असते. आधार अपडेट होत नसल्यामुळे अनेक समस्या उभ्या राहत आहेत. त्यात नागरिकांवर शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.


अनेकांकडे जन्माची नोंदच नाही
जुन्या काळातील जन्माच्या नोंदी मिळणे कठीण आहे. काही कुटुंब अशिक्षित असल्यामुळे त्यांनी जन्माची नोंदणी केली नाही. अशांनी जन्माचे प्रमाणपत्र कुठून आणावे, असा प्रश्न ज्येष्ठ नागिरकांना पडत आहे.
 

Web Title: Thumbprints do not appear in old age; How to Update Aadhaar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.