वाघाची दहशत; आमदारांच्या उपस्थितीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:29 AM2018-10-07T00:29:32+5:302018-10-07T00:30:28+5:30
मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : मागील सात दिवसांपासून तालुक्यात वाघाने ठाण मांडुन दोन पाळीव जनावरांना ठार केले. यामुळे वडनेर परिसरातील गावांमधील नागरिक व शेतकरी तसेच शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पाश्वभूमिवर शनिवारी आ. समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली.
सदर बैठकीला नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, तहसीलदार सचिन यादव, वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, पं. स सभापती कोल्हे, पं. स. सदस्य डॉ. विजय पर्बत, जि.प. सदस्य माधव चंदनखेडे, मिलिंद कोपुलवार, न. प. सभापती नरेश ईवनाथे, नगरसेवक प्यारू कुरेशी, अमोल खंदार, संदीप सुरकार आदींची उपस्थिती होती. या वाघाने आतापर्यंत दोन पाळीव जनावरे गतप्राण केली असून परिसरात वाघाची दहशत आहे. संभाव्य धोका लक्षात घेवून आम्ही वडनेर परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय किमान दोन दिवस तरी शेतात न जाण्याची विनंती आम्ही शेतकºयांना केली आहे. शिवाय दहा सदस्यीय वन विभागाचे विशेष पथक वाघाच्या मागावर आहेत. शेत शिवारात वाघाचा मुक्तसंचार चिंतेचा विषय असल्याने वाघाला तातडीने पकडण्यासाठी आम्ही संबंधितांना परवानगी मागितली असल्याचे यावेळी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांनी सांगितले. वाघाला आपल्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी ग्रामस्थांनी वाट मोकळी करून द्यावी, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा होत वर्धा जिल्ह्यातील सावंगी (हेटी) शिवारात दाखल झालेला साडेतीन वर्षीय वाघाने मागील आठ दिवसांपासून वडनेर परिसरात ठाण मांडले आहे. अनेकांना या वाघाचे दर्शन झाले असल्याचे आपल्याला ग्रामस्थांनी सांगितल्याचे याप्रसंगी वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी स्पष्ट केले. शिवाय आपण स्वत: लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.