बोर अभयारण्यात वाघांचा संचार वाढला; चार नव्या वाघांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:10 PM2024-08-05T17:10:38+5:302024-08-05T17:15:48+5:30
Wardha : एकूण वाघांची संख्या पोहोचली १९ वर, अहवालाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बोर वन्यजीव अभयारण्य हे देशातील सर्वांत लहान व्याघ्र प्रकल्प अशी ओळख आहे. ८१६ चौ. किमी पसरलेल्या या अभयारण्यात वाघांना पोषक वातावरण उपलब्ध झाल्याने वाघांची संख्या वाढली आहे. नुकत्याच झालेल्या वाघांच्या प्रगणनेत चार वाघांची भर पडली असून, ही संख्या १९ वर गेल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
बोर व्याघ्र अभयारण्य हे त्याच्या विपुल जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे, तसेच वाघांसह विविध प्रकारच्या प्राण्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिवास आहे. नुकतेच या व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे एकसंघ नियंत्रण झाल्याने कोअर क्षेत्राचा ताबा वन्यजीव विभागाला देण्यात आला आहे. यंदा मार्च ते एप्रिल महिन्यात या बोर व्याघ्र प्रकल्पात वाघांची प्रगणना करण्यात आली. गणनेसाठी ट्रॅप कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. याच चित्रीकरणाच्या सूक्ष्म अवलोकनात चार नवीन वाघांची नोंद घेण्यात आली आहे यात बांगडापर हिंगणी कवडस न्यू बोर, ओल्ड बोर या ठिकाणी या चार वाघांचा मुक्त संचार असल्याचे आढळून आले आहे.
वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशन डेहराडून येथील तज्ज्ञांच्या चमूने अवलोकन करून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल बोर व्याघ्र प्रकल्पाला येत्या पंधरवयात मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर वाघांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होणार आहे. वाघांच्या अधिवासाचा वाढता आलेख बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आकर्षक ठरणार असून याचा पर्यटनाला मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे
बंगाल वाघ मुख्य आकर्षण
- राखीव हे बंगाल वाघ, भारतीय बिबट्या, सांबर, चितळ, माकड आणि भारतीय बायसन यासारख्या सस्तन प्राण्यांच्या विविध प्रजातींचे घर आहे.
- बेंगाल टायगर्स हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. २०१४ पूर्वी बोर अभयारण्य आणि त्याच्या परिसरात फक्त सहा ते सात वाघांची संख्या होती. वाघांना पोषक वातावरण मिळाल्याने या ठिकाणी ही संख्या सध्या १९ वाघांपर्यंत पोहोचली आहे.
३९६ ट्रॅप कॅमेऱ्यांची झाली मदत
१३८ चौरस किमीचे बफर क्षेत्र, तर ६७४ चौरस किमीच्या कोअर क्षेत्रात वाघांच्या हालचालींची नोंद घेण्यासाठी ३९६ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले होते. महिनाभर हाचलालींचे निरीक्षण केल्यानंतर ४ नव्या वाघांची नोंद यात घेण्यात आली आहे.
पूर्वी १५ वाघांची होती नोंद
गतवर्षी झालेल्या प्रगणनेत बोर व्याघ्र प्रकल्पात ९ मोठे, तर ६ किशोर वाघांची नोंद घेण्यात आली होती. यात चार वाघांची भर पडली असून, दोन नर, तर दोन मादी वाघांचा समावेश असल्याचे निरीक्षणात पुढे आले आहे. यांचे टी-१६, टी-१७, टी-१८, टी-१९, असे नामकरण ठेवण्यात आले आहे.
"मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या वाघांच्या प्रगणनेचे चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रिकरण वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशनकडे सूक्ष्म निरीक्षणासाठी पाठिवण्यात आले आहे. दरम्यान चार नव्या वाघांची नोंद घेण्यात आल्याचे निरीक्षणात पुढे आले आहे. मात्र, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमकी वाघांची संख्या किती? हे कळणार आहे. आठ-पंधरा दिवसांत अहवाल सादर होणार आहे."
-मंगेश ठेंगडी, उपवन संरक्षक, (प्रादेशिक), वन विभाग, वर्धा