जुनोना शिवारात वाघाची दहशत; दोन जनावरांचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 05:00 AM2021-08-21T05:00:00+5:302021-08-21T05:00:17+5:30
तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, असा अंदाज ग्रामस्थांनी बांधताच पहाटेच्या सुमारास पुन्हा गावातीलच एका पशुपालकाच्या गोठ्यात दिसून आला. या प्रकारामुळे लिंगा मांडवी गावात वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगला लगत असलेल्या जुनोना शिवारात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर असून त्याने एका आठवड्यात दोन पाळीव जनावरांचा फडशा पाडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जुनोना शिवार हा जंगल व्याप्त परिसर आहे. वन्यप्राणी शेतात प्रवेश करून उभ्या पिकांची नासाडी करतात. त्यामुळे या शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांना रात्री शेतात जागलीला जावे लागते. अशातच आता पट्टेदार वाघाचा ही या परिसरात वावर असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशत पसरली आहे.
एका आठवड्यात पट्टेदार वाघाने दोन जनावरांना ठार केल्याने तळेगाव येथील शेतकरी राजेंद्र ठाकरे आणि किसन केने यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुनोना शिवारात शेत जमिनी असलेले शेतकरी अल्पभूधारक असून या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राजू ठाकरे, किसन केने, किसना कळसकर, सुभाष पाचपोहर, उत्तम भुयार, प्रकाश गाडगे, सुधाकर मांडळे, प्रल्हाद भोजने, मारोत भोजने, नारायण भोजने, अरविंद सायवान, रामराव घोडे, पुंडलिक इरखडे, किसन उईके, अनिल रिठे, अनिल फसाटे, विनोद खवले, राजू बुले, विनोद बोडखे आदींनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाघाने ठोकला लिंगा मांडवी गावात मुक्काम
- कारंजा (घाडगे) : तालुक्यातील लिंगा मांडवी गावात १९ रोजी पट्टेदार वाघाने थेट गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या जनावराला जखमी केले. जनावरांचा आवाज आल्याने, पशुपालकाने पाहणी केली असता, पट्टेदार वाघ गोठ्यात ठाण मांडून होता. रात्रभर पहारा दिल्यावर वाघ जंगलात गेला, असा अंदाज ग्रामस्थांनी बांधताच पहाटेच्या सुमारास पुन्हा गावातीलच एका पशुपालकाच्या गोठ्यात दिसून आला. या प्रकारामुळे लिंगा मांडवी गावात वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
- लिंगा हे गाव जंगलव्याप्त परिसरात असून, रात्रीच्या सुमारास गोठ्यातील जनावरे ओरडत असल्याने, शिवाजी डोंगरे यांनी गोठ्यात जाऊन पाहणी केली असता, गोठ्यात वाघ असल्याने त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर, त्यांनी आरडाओरड केली असता वाघाने धूम ठोकली. त्यानंतर, बारकाईने पाहणी केली असता, वाघाने आठपैकी एका जनावराचा कान तोडून त्यास जखमी केल्याचे निदर्शनास आले. रात्रभर वाघाला हाकलून लावण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. मध्यरात्री उशिरा वाघ जंगलाकडे गेला असावा, असा अंदाज ग्रामस्थांकडून बांधला जात असतानाच, पहाटेच्या सुमारास उमेश गुलाब बिसेने यांच्या गोठ्यात वाघ दिसून आला. एकूणच लिंगा मांडवी गावात रात्रभर वाघाचा मुक्काम राहिल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.