वाघाचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:05 AM2018-03-07T00:05:10+5:302018-03-07T00:05:10+5:30
ऑनलाईन लोकमत
आकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुुसुंद गावानजीक नाल्याच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. त्या वाघासोबत आणखी एक वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एच. ताल्हन, वनपाल दिनकर पाटील हे ताफ्यासह दाखल झाले. गावालगत असलेल्या या वाघाला जंगलात हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहे.
गावापासून हाकेच्या अंतरावर नरेश लेंडे, राजू उईके, सुरेश गवळी, राकेश डवले हे त्यांच्या शेळ्या नदी काठावर चारत होते. येथे अचानक दोन वाघांनी कळपावर हल्ला केला. घाबरलेल्या शेळी पालकांनी मोठ्याने ओरडत ग्रामस्थांना माहिती दिली. गावकरी काठ्या घेवून येताच वाघ नदी नाल्यातील झुडपात गेले. तोपर्यंत चार शेळ्या ठार झाल्या होत्या. सदर घटनेने सुसुंद व सुसुंद (हेटी) या दोन्ही गावात दहशत पसरली आहे.
वनविभागाचे कर्मचारी सायंकाळपर्संत या भागात फटाके व बारुद फोडून या दोन्ही वाघांना जंगलाकडे हाकलण्याचा प्रयत्न करीत होते.
सकाळी १० वाजता वाघाने केलेल्या या हल्ल्यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. पट्टेदार वाघांसोबत वयात आलेला दुसरा वाघ होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्याला जंगलाकडे हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहे.
-दिनकर पाटील, वनपाल