वाघाची पाच दिवसांपासून दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:43 AM2018-10-10T00:43:22+5:302018-10-10T00:44:07+5:30
सावंगी हेटी हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. लागूनच चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागलेली आहे. सावंगी हेटी या गावाला लागूनच पोथरा नदी वाहते. पोथरा नदीच्या तिरावर काही गावकऱ्यांना वाघ आढळून आला व नदीच्या काठावर चिखलामध्ये वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेर : सावंगी हेटी हे गाव वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आहे. लागूनच चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागलेली आहे. सावंगी हेटी या गावाला लागूनच पोथरा नदी वाहते. पोथरा नदीच्या तिरावर काही गावकऱ्यांना वाघ आढळून आला व नदीच्या काठावर चिखलामध्ये वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. वाघ दिसताच ही बातमी सर्व गावभर पसरल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
त्यादिवशी शेतावर कोणीही गेले नाही व लगेच वन विभागाला कळविण्यात आले. त्याच दिवशी रात्री ८ वाजता हाच वाघ गावकऱ्यांनी नगा दाते यांच्या घराजवळ यांच्या बैलाजवळ असलेला दिसला परंतु लोकांच्या जमावामुळे तो वाघ येथून पळाला. त्या दिवशीच्या रात्री वाघाच्या दहशीतमुळे कोणीही झोपू शकले नाही. ती रात्र सर्व गावकऱ्यांनी जागून काढली व दुसऱ्या दिवशी वन विभाग कर्मचारी व गावकऱ्यांनी वाघाचा शोध सुरू केला. त्याप्रमाणे तो वाघ नदीच्या पलिकडे गेल्याचे आढळले. त्यानंतर पुढे शेतात गेल्यानंतर त्यांना वाघानी बैल ठार केल्याचे आढळले. लोकांनी गुरे, ढोरे घरीच बांधून ठेवली. तसेच ज्या ठिकाणी बैल मारला गेला त्या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरे लावण्यात आले होते.
त्या कॅमेऱ्याची शहानिशा केल्यानंतर असे आढळले की वाघ संध्याकाळी सहा वाजता त्या बैलाजवळ गेल्याचे आढळले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या कॅमेऱ्यानुसार शिकार केलेल्या बैलाजवळ येवून त्याचे मास खाल्याचे आढळले. व तेथील काही गावकऱ्यांनी व तसेच राज्य राखीव दलाच्या पथकाने व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुध्दा पाहिले.
चंद्रपूरचा वाघ वर्धेत दाखल
चंद्रपूर जिल्ह्यातून भटकलेला हा वाघ वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील गावांमध्ये फिरत आहे. त्यामुळे या भागात मोठी दहशत निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी कुणीही बाहेर पडत नाही. वरोरा वनविभागाने या वाघावर पाळत ठेवली होती. मात्र हा वाघ वर्धा जिल्ह्यात दाखल झाला.