बोरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात वळू ठार
By admin | Published: December 28, 2016 12:41 AM2016-12-28T00:41:17+5:302016-12-28T00:41:17+5:30
तालुक्यातील बोरगाव (टु.) शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातल्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण
बोरगाव (टुमणी) येथील घटना : वनविभागाचे दुर्लक्ष; गावकऱ्यांची रात्र गस्त
वर्धा : तालुक्यातील बोरगाव (टु.) शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातल्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. वाघाच्या हल्ल्या एक वळू ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. यामुळे या भागात कामाकरिता जाताना शेतकऱ्यांत भीती असल्याचे पसरली असून वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.
बोरगाव (टुमणी) येथील शेतकरी साहेबराव शिलसकर व अनिल बापूराव शिलसकर यांच्या शेतात गोठा आहे. शेत गावाजवळ असल्याने गोठ्यात नेहमीप्रमाणे गायीसह तीन गोऱ्हे बांधून ठेवतात. रात्री वाघ शेतातील गोठ्यात आला व बांधून असलेल्या एका वळूचा जीव घेतला. रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्यामुळे सकाळी घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती साहूर परिक्षेत्राचे वनअधिकारी पोहेकर यांना देण्यात आली. घटनास्थळ पाहून पंचनामा करण्यात आला. सोबतच शवविच्छेदनही झाले.
ही घटना घडून तीन दिवसांचा कालावधी लोटला व त्याच ठिकाणी शेजारी असणाऱ्या अनिल शिरसकर यांच्याही एका गोऱ्ह्यावर वाघाने झडप घातली. यात तो जखमी झाला आहे. तेथे दोन वळूंसह एक गाय होती. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेला वळू जिवंत आहे. पण त्याची मृत्यूशी झुंज कायम आहे. गावशेजारी असलेल्या गोठ्यात येऊन वाघ शिकार करीत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. वाघ कोणत्या मार्गाने येतो हे पाहण्याकरिता ग्रामस्थांनी आता रात्र गस्त सुरू केली. पण वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. वाघाच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)