गणेशाला यंदा बाहुबली, जय मल्हारच्या रूपाची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2015 02:16 AM2015-09-09T02:16:01+5:302015-09-09T02:16:01+5:30
साऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. यामुळे त्यांच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.
प्रभाकर शहाकार पुलगाव
साऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. यामुळे त्यांच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती बनविताना काही ना काही खास आकर्षण राहत आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बहुचर्चित चित्रपट बाहुबली, लोकप्रिय ठरलेली टीव्ही मालिका जय मल्हार यातील व्यक्तिरेखांची भुरळ असल्याचे दिसते.
अशा आकर्षक मूर्ती तयार करताना कलाकारांना पावसाचा लहरीपणा, मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, मजुरीची झालेल्या दरवाढीचा फटका सहन करावाव लागत आहे. मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराची सध्या धावपळ सुरू असून त्याच्या कुटुंबीयांचे हातही या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. पुलगावात विविध रंगरुप, वेगवेगळ्या छटांच्या जवळपास ३०० मोठ्या व १२०० लहान अशा दीड हजार मूर्तींवर अखेरचा हात फिरविणे सुरू आहे.
दशकापूर्वी प्रसिद्धीत असलेल्या गणेशोत्सवात हिंगणघाट फैल भागातील कुंभारपुऱ्यात १३ ठिकाणी गणेशाच्या मूर्ती साकारण्याचे काम सुरू असून मूर्तिकार अरुण गाते यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी मूर्ती साकारत आहेत.
पुलगाव कॉटन मिलच्या वैभवशाली गणेश उत्सवाची परंपरा जयभारत टेक्सटाईल्सच्या उदासीन धोरणामुळे खंडीत झाली. असे असले तरी शहरात जवळपास ४० तर ग्रामीण भागात ५०-५५ अश्या ९५ सार्वजनिक गणेश मंडळांनी या उत्सवाचे सातत्य आजही कायम आहे. शहरातील नामवंत मुर्तीकार नागोराव इंगळे यांचे पुत्र सुरेश इंगळे व वारसा हक्काने तिसऱ्या पिढीतील नातू स्वप्नील व निखिल इंगळे मूर्तिकला जोपासत आहेत. यंदा या भावंडांनी १२ फूट उंच लालबागचा राजा, १० फुटाची जय मल्हारसह जवळास ४०० मूर्ती साकारल्या आहेत. हरिराम नगरात सात जणाचे कुटुंबाचा आधार असलेला ३५ वर्षीय सुरज ठाकूर या युवा कलावंताने गेल्या दशकांत मूर्तिकलेत चांगलेच नाव कमाविले. यंदा त्याने साकारलेली १० फुटाची अश्वारुढ जय मल्हार तर १२ फुटाची लालबागचा राजासह जवळपास ६०० गणेशमूर्ती भक्ताचे लक्ष वेधून त्यांच्या जीवंत कलेची साक्ष देते.
येथील मूर्तिकारकडून धामणगाव, तळेगाव, देवळी, नाचणगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती बुकींग केली आहे.