‘कार रेसिंग’चा नादच ठरला काळ! वर्धेतील अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:54 AM2022-02-01T09:54:31+5:302022-02-01T09:55:00+5:30
Vardha Accident: देवळीनजीकच्या सेलसुरा येथे २५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
वर्धा : देवळीनजीकच्या सेलसुरा येथे २५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तब्बल सात दिवसांनंतर या विद्यार्थ्यांचा अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून एका काळ्या रंगाच्या कारसोबत लावलेली ‘रेस’ त्यांच्या जीवावर बेतल्याचे पुढे आले आहे.
सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सात जिवलग मित्र इसापूरजवळील एका प्रसिद्ध ढाब्यावर पवन शक्ती याचा वाढदिवस साजरा करून परतत असताना एका कारसोबत लावलेल्या रेसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसलेल्याने हा व्हिडिओ शूट केला. वेगावर नियंत्रण न मिळाल्याने कार सरळ पुलावरून ४० फूट नदीत कोसळली.
एकाने म्हटले सर... जरा आरामसे चलाव...
एका काळ्या रंगाच्या कारबरोबर रेस लावताना मृतक सातही डॉक्टर बसलेल्या गाडीचा वेगही १५० च्यावर होता. दरम्यान, कारमधील एका तरुणाने सर गाडी जरा आरामसे चलाव...असा शब्दप्रयोग केला होता. शिवाय कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसून आले. सातही तरुण जोरजोराने आरडाओरड करून सेलिब्रेशन करीत असल्याचेही दिसून येत होते.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिळाला व्हिडिओ
वाढदिवस साजरा करून परत येताना अपघातात मृत पावलेल्या शुभम जयस्वाल याने कारसोबत लावलेल्या रेसिंगचा व्हिडिओ शूट करून अपघाताच्या काही वेळापूर्वीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. तेथूनच हा व्हिडिओ पुढे व्हायरल झाल्याची माहिती आहे.