विदर्भातील लोकप्रिय गायकावर शेळ्या राखण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:40 PM2018-09-04T14:40:49+5:302018-09-04T14:41:12+5:30
आपल्या सुरेल आवाजाने अवघ्या विदर्भ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या कलावंतांवर पोटापाण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली असल्याचे वास्तव वर्धा जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
सचिन देवताळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपल्या सुरेल आवाजाने अवघ्या विदर्भ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या कलावंतांवर पोटापाण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली असल्याचे वास्तव वर्धा जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. प्रल्हाद हटकर असे या कलावंताचे नाव असून त्यांच्यासारख्या राज्यातील अन्य काही कलावंतावरही आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने उपासमारीचीही वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील कलावंतांना आधार देण्यासाठी सरकारने योग्य उपाय योजना करण्याची गरज असल्याची खंत हटकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
विदर्भातील संगीत क्षेत्रात प्रल्हाद हटकर यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांना प्रसिद्ध गायक म्हणून त्यावेळी ओळखही मिळाली. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रल्हाद हटकर यांचे अनेक चाहतेही निर्माण झाले. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे सध्या त्यांच्यावर शेळ्या राखण्याची वेळ आली आहे. ठिकठिकाणी आयोजित होणाऱ्या प्रल्हाद हटकर यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील प्रेक्षक मोठी गर्दी करायचे. इतकेच नव्हे तर गीत व भजन प्रेमी त्यांनी सादर केलेली रचना ऐकण्यासाठी यायचे. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्याने व उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने त्यांना गायन क्षेत्राकडे पाठ दाखवावी लागली. सध्या ते शेळ्या राखून स्वत:सह कुटुंबियांचे पालन-पोषण करीत आहेत.
‘सारे रिश्ते नाते सब छोड के आ गयी’ कानावर पडताच श्रोते व्हायचे मंत्रमुग्ध
प्रल्हाद हटकर यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला श्रोते एकच गर्दी करायचे. कार्यक्रमादरम्यान प्रल्हाद हटकर यांनी गायलेले नागिन या हिंदी चित्रपटातील ‘सारे रिश्ते नाते सब छोड के आ गयी’ हे गीत ऐकून श्रोतेही मंत्रमुग्ध व्हायचे, हे विशेष.
मानधनाची प्रतीक्षा
अनेक पुरस्कार प्राप्त गायक प्रल्हाद हटकर यांना कलावंतांसाठी असलेल्या शासकीय मानधन सुरू करण्यात आलेले नाही. ते शासकीय योजनेपासून वंचित असून त्यांना सदर मानधनाची प्रतीक्षा आहे.