यंदाही अक्षयतृतियेचा मुहूर्त हुकला; विवाहसोहळे लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:00 AM2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:08+5:30

जिल्ह्यातील विवाहेच्छुुकांनी अक्षय तृतीयेसह मे महिन्यातील शुभ तिथीवर साध्यापद्धतीने विवाह उरकविण्याचे नियोजन केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला ८ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे अनेकांना अक्षय तृतीयेला विवाह करण्यासाठी तयारी चालविली होती. मात्र, हा लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढविल्याने ‘शुभ’ मुहूर्तावरील ‘विवाह’ सोहळ्यांवर विरजन पडले आहे. 

This time too, the moment of Akshay Tritiya was missed; Wedding Lockdown! | यंदाही अक्षयतृतियेचा मुहूर्त हुकला; विवाहसोहळे लॉकडाऊन!

यंदाही अक्षयतृतियेचा मुहूर्त हुकला; विवाहसोहळे लॉकडाऊन!

Next
ठळक मुद्देशंभरावर विवाह रद्द : वर-वधू पित्यांचा खर्चावर पाणी, आता विवाहेच्छुुकांना केवळ प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या प्रकोपामुळे धुमधडाक्यात विवाह सोहळा उरकविण्याच्या पद्धतीला गेल्यावर्षीपासून ब्रेक लागला आहे. यावर्षी नाही तर पुढल्यावर्षी विवाहाचा धडाक्यात बार उडवावा, अशी अनेकांनी आशा बाळगली होती. परंतु यावर्षीही कोरोनाने पिच्छा पुरविल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतियेच्या शुभ मुहूर्तावर विवाहांची धूम असते पण, गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही कडक निर्बंध असल्याने हा महत्वाचा मुहूर्त हुकला. कडक निर्बंधामुळे या मुहूर्तावर होणारे शंभरावर विवाह रद्द करावे लागल्याने वर-वधू पित्यांचा खर्चही व्यर्थ ठरला.
जिल्ह्यातील विवाहेच्छुुकांनी अक्षय तृतीयेसह मे महिन्यातील शुभ तिथीवर साध्यापद्धतीने विवाह उरकविण्याचे नियोजन केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला ८ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. त्यामुळे अनेकांना अक्षय तृतीयेला विवाह करण्यासाठी तयारी चालविली होती. मात्र, हा लॉकडाऊन १८ मे पर्यंत वाढविल्याने ‘शुभ’ मुहूर्तावरील ‘विवाह’ सोहळ्यांवर विरजन पडले आहे. 
आता या कालावधीत गावखेड्यातही विवाह करता येणार नाहीत. प्रत्येक गावामध्ये प्रशासनाचे भरारी पथक घिरट्या घालत आहेत. सोबतच सरपंच, पोलिस पाटील व  तलाठी यांनाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात. त्यामुळे  कारवाईला समोरे जाण्यापेक्षा विवाह समारंभ नको रे बाबा! अशीच भूमिका वर-वधू पक्षांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
 

मे महिन्यात आहे हे मुहूर्त
एप्रिल ते जुलै महिन्यापर्यंत ३७ मुहूर्त आहेत. त्यापैकी मे महिन्यामध्ये शुभ दिवस अधिक आहेत. मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तासह १३, १५, २१, २२, २३, २६, २९, ३० व ३१ मे या दिवशी चांगली तिथी आहेत. जूनमध्ये १५ तर जुलैमध्ये सात मुहूर्त आहेत.

विवाहसोहळ्यात नियमाचा येतोय अडसर
जिल्ह्यात विवाहसोळ्यासाठी नियमांचा मोठ्या प्रमाणात अडसर ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी दिली. त्यानंतर विवाहाकरिता दोन तासाचा कालावधी देण्यात आला. यातच जिल्ह्यामध्ये वऱ्हाड्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्याने अनेकांनी विनापरवानगी विवाह करण्यावर भर दिला. बऱ्याच नातेवाईकांनी जिल्ह्याबाहेर जाऊन शेतशिवारात विवाहसोहळा उरकविला.

यंदाही कर्तव्य नाहीच...

विवाह ठरला पण, या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी आल्याने तो वारंवार पुढे ढकलावा लागला. सुरुवातीला ४ मे रोजी विवाह निश्चित करुन तयारीला सुरुवात केली होती. परंतु सुरुवातीला १३ मे पर्यंत कडक निर्बध लादल्याने ती तारीख रद्द करुन १४ मे ही तारिख ठरविली. पण, लॉकडाऊन आणखी वाढल्याने ही तारिख सुद्धा रद्द करावी लागली. त्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
- संकेत प्र. आगलावे, वर्धा.
 

मुलाच्या विवाहाची तारीख १६ मार्च ठरवून सर्व तयारी पूर्ण झाली होती. मुलगाही सुट्या टाकून वर्ध्यात आला. पण, लॉकडाऊनमुळे ५ एप्रिल, २२ एप्रिल या तारखाही रद्द कराव्या लागल्यात. १३ मेपर्यंत कडक निर्बंध राहणार म्हणून १४ मे ही तारीख निश्चित केली. पण, आता मुदतवाढ झाल्याने तिही रद्द करावी लागली. विवाह कधी करावा हा प्रश्नच आहे.
- अरविंद वि. मिस्किन, दहेगाव (मि.)

मंगल कार्यालयांचे   आर्थिक गणित बिघडले
- जिल्ह्यात दोनशे मंगल कार्यालये व लॉन असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर सेवा व्यवसायिकांना गेल्या वर्षीपासून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
- विवाहाकरिता आरटीपीसीआर चाचणी, पोलीस परवानगी आदी अटी असल्याने बहुसंख्य नागरिकांनी मंगल कार्यालयात विवाह करण्याकडे पाठ फिरविली आहे.
- आता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर काहींनी मंगलकार्यालयात बुकींग केले होते. पण, कडक निर्बंधामुळे तेही रद्द झाल्याने मंगल कार्यालयाचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
- वर्षभरात एकही विवाह न झाल्याने मंगलकार्यालयाच्या स्वच्छतेचा खर्च, विद्युत बिल, ग्रामपंचातय व नगरपालिकेचा कर, बँकांचे हप्ते आदी थकल्याने आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.

 

Web Title: This time too, the moment of Akshay Tritiya was missed; Wedding Lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.