तूर पावसात भिजली
By admin | Published: June 1, 2017 12:35 AM2017-06-01T00:35:37+5:302017-06-01T00:35:37+5:30
शासनाच्या अस्पष्ट धोरणामुळे तूर खरेदी रखडत सुरू आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर खरेदी सुरू आहे;
बाजार समितीतील प्रकार : १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचा वर्धेत मुक्काम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्या अस्पष्ट धोरणामुळे तूर खरेदी रखडत सुरू आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर खरेदी सुरू आहे; पण तोकड्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना १० ते १५ दिवस मुक्काम करावा लागत आहे. यातच बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सुमारे दोन ते तीन हजार क्विंटल तूर भिजली. टोकण दिलेले असल्याने यात शासनाचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने तूर खरेदीला मुदतवाढ दिली होती. यामुळे प्रथम २७ मे पर्यंत व नंतर ३१ मे पर्यंत तूर खरेदीचे धोरण होते. आता मुदतवाढ दिल्याची माहिती आहे; पण बाजार समितीला अधिकृत सूचना नाहीत. सध्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत महाराष्ट्र पणन महासंघाकडून तूर खरेदी केली जात आहे. वर्धा बाजार समितीमध्ये ३१ मे पर्यंत सुमारे ७ ते ८ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असून ती तूर बाजार यार्डवर खरेदी केली जात आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ताडपत्री व अन्य व्यवस्था करून तूर सुरक्षित केली आहे; पण पोत्यांमध्ये भरून खरेदीसाठी दोन ते तीन हजार क्विंटल तूर उघड्यावर ठेवलेली आहे. आज पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक पाऊस आल्याने पोत्यांतील अंदाजे दोन ते तीन हजार क्विंटल तूर भिजली आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२७ मे पासून आजपर्यंत सुमारे ३७५ शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले आहे. तो माल शेतकऱ्यांच्या घरीच असून बाजार यार्ड आणि शेड रिकामे झाल्यानंतर तथा बाजारात आलेल्या तुरीची खरेदी झाल्यानंतर बोलविला जाणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेला मालही तब्बल ८ ते ९ हजार क्विंटल असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीचे ४० आणि व्यापाऱ्यांच्या १५ ते २० हमालांच्या माध्यमातून तूर खरेदी सुरू आहे. यासाठी सात काट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे; पण बुधवारी प्रत्यक्षात तीनच काट्यांद्वारे तुरीचे मोजमाप केले जात असल्याचे दिसून आले. परिणामी, तूर खरेदीला विलंब होत आहे. ग्रेडरकडूनही मनमानी कारभार सुरू असल्याने शेतकरी वैतागले आहेत. बाजार समितीचे सभापती व सचिवांनी अनेकदा सूचना देऊनही सुरळीत तूर खरेदी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बाजार समिती प्रशासनाने तूर खरेदीचा वेग वाढविणे गरजेचे झाले आहे.
गोदाम रिकामे नसल्याने सहा हजार क्विंटल तूर शेडमध्येच पडून
वर्धा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली तूर ब्रह्मपूरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठविला जातो. केवळ कारंजा (घा.) बाजार समितीतील तूर वाडी (नागपूर) येथील गोदामात पाठविली जाते. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली सुमारे ६ ते ७ हजार क्विंटल तूर बाजार समितीच्या शेडमध्येच पडून आहे. एक ट्रक गोदामात पोहोचण्यास दोन दिवस लागतात. गोदामात जागा नसल्याने तूर ठेवायची कुठे, हा प्रश्नच आहे.
हेक्टरी १० क्ंिवटलची मर्यादा
सध्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शेतक्यांकडून तूर खरेदी केली जात आहे. यासाठी टोकण दिले जात असून प्रती शेतकरी प्रती हेक्टरी १० क्ंिवटल व अधिकाधिक प्रती शेतकरी २५ क्विंटल तूर खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
९० हजार क्विंटल तूर घरीच
नाफेड, एफसीआयने २२ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १.२० लाख क्विंटल तूर खरेदी केली. यानंतरही १६ ते ३१ मे दरम्यान ४८ हजार क्विंटल तूर खरेदी केली. आता बाजार हस्तक्षेप योजनेत पणन महामंडळाने ३३ हजार तूर खरेदी केली. ४ हजार शेतकऱ्यांना टोकण दिले असून अंदाजे ९० हजार क्विंटल तूर खरेदी व्हायची आहे.
३८०० क्विंटल तूर खरेदी
बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत पणन महासंघाच्यावतीने आजपर्यंत ३ हजार ८०० क्ंिवटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. सदर माल अद्यापही बाजार समितीच्या शेडमध्ये पडून असल्याने यानंतर खरेदी केलेली तूर ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले. तत्पूर्वी एफसीआयमार्फत १२ हजार २७० क्विंटल, नाफेडमार्फत ९ हजार ६३४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.