पाण्याकरिता निवेदने देऊन थकलो, अखेर कार्यालयातच येऊन बसलो! पिपरीच्या ग्रामस्थांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 01:58 PM2022-11-02T13:58:50+5:302022-11-02T14:07:53+5:30

जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात दिवसभर दिला ठिय्या

Tired of making requests for water, finally came and sat in the office! Pipri villagers Rage | पाण्याकरिता निवेदने देऊन थकलो, अखेर कार्यालयातच येऊन बसलो! पिपरीच्या ग्रामस्थांचा रोष

पाण्याकरिता निवेदने देऊन थकलो, अखेर कार्यालयातच येऊन बसलो! पिपरीच्या ग्रामस्थांचा रोष

googlenewsNext

वर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायत परिसरामध्ये सातत्याने लोकसंख्या वाढत असल्याने पिपरी (मेघे) ग्रामपंचायतसह इतर ११ गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून हे काम तातडीने पूर्णत्वास जाण्याची आवश्यकता असतानाही सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रार, निवेदन देऊनही जीवन प्राधिकरणने लक्ष दिले नसल्याने संतप्त नागरिकांनी आज जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात ठिय्या मांडून जोपर्यंत जलवाहिनीची जोडणी होणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा निर्णय घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

पिपरी (मेघे) या गावासह इतर ११ गावांना नियमित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा होतो. या गावांमधील लोकसंख्या वाढत असल्याने त्यांनाही व्यवस्थित नियमित पाणीपुरवठा व्हावा म्हणून तीन वर्षांपूर्वी या गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यानंतर वर्षभरात या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पूर्णत्वास नेणे आवश्यक होते, पण याकडे अधिकाऱ्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने आता तीन वर्षांचा काळ लोटला तरीही पिपरी गावातील काही भागांमध्ये अद्यापही पाणी मिळाले नाही.

जीवन प्राधिकरणने केवळ जहवाहिनी टाकून ठेवली; परंतु त्याची जोडणी केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून घरोघरी नळ जोडण्या पोहोचविल्या तरीही जलवाहिनीची जोडणी न झाल्याने नागरिकांना पाणी मिळण्यासाठी अडचण जात आहे. यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी निवेदने व तक्रारी दिल्या. तरीही जीवन प्राधिकरणला जाग आली नसल्याने अखेर माजी पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल मोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खंडारे यांच्या नेतृत्वात महिलांसह ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठून ठिय्या दिला.

यावेळी जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी. वाय. मदनकर यांनी ग्रामस्थांची भेट घेतली असता जोपर्यंत पाणी मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका मांडल्याने दिवसभर ग्रामस्थांनी ठिय्या दिला. अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वीस दिवसांचे दिले लेखी आश्वासन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्यावर तातडीने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठले. यावेळी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेतल्यावर जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी. वाय. मदनकर यांनी वीस दिवसांमध्ये जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

विकत घ्यावे लागते पाणी...

पिपरी ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक दोनमधील मालेकर ले-आऊट परिसरात पाण्याची मोठी पंचाईत आहे. या परिसरात १०६ घरे असून साधारणत: ६०० लोकवस्ती आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने या परिसरात बोअरिंग करून पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला, पण बोअरिंगला पाणीच लागले नाही. एकाच कूपनलिकेच्या भरवशावर पाण्याची सोय आहे. काही नागरिकांनी बोअरिंग केले असून त्यांच्याकडून विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले. ग्रामपंचायतीने नळजोडणी दिली; परंतु जीवन प्राधिकरणकडून मुख्य जलवाहिनीच जोडली नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सांगितले.

जीवन प्राधिकरण विभागाने पिपरी गावात जलवाहिनी टाकली; परंतु जोडणी न केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात वारंवार निवेदन देऊनही काहीच उपाययोजना होत नसल्याने आज ठिय्या आंदोलन करावे लागले. वीस दिवसांमध्ये काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यानंतरही काम पूर्ण झाले नाही तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंदोलन केले जाईल.

- प्रफुल्ल मोरे, माजी पंचायत समिती सदस्य.

वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत मालेकर ले-आऊट पाणीपुरवठा करण्यासाठी दीड वर्षापूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली. त्याची जोडणी करुन तपासणी करून पाणीपुरवठा करायचा होता. पण, पावसाळ्यात काम करता आले नाही. दिवाळीपूर्वी काम सुरू केल्यानंतर दिवाळीत मजूर गेल्याने काम थांबले. आता प्राधान्याने हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.

पी.वाय मदनकर, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा

Web Title: Tired of making requests for water, finally came and sat in the office! Pipri villagers Rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.