बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला टकाचोर
By महेश सायखेडे | Published: October 9, 2023 07:20 PM2023-10-09T19:20:42+5:302023-10-09T19:21:33+5:30
वन्यजीव सप्ताह निमित्त राबविला पक्षी निरीक्षण उपक्रम
वर्धा: देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. याच व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पक्षी निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला. याच उपक्रमादरम्यान बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव व पक्षी प्रेमींना टकाचोर या पक्षाचे दर्शन झाले. अतिशय रुबाबदार दिसणाऱ्या या पक्षाचे छायाचित्रही यावेळी काहींनी टिपले.
टकाचोर हा पक्षी वर्धा जिल्ह्यातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात आढळत असला तरी ज्यावेळी पक्षी निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी त्याचे सहज दर्शन होत नाही. जंगल पिंजून विविध पक्षांचे निरीक्षण करीत असताना पक्षीप्रेमींना बोर व्याघ्र परिसरात टकाचोर या पक्षाचे दर्शन झाल्याने पक्षी व वन्यजीव प्रेमींमध्ये नवा उत्साहच संचारला होता.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या या उपक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकार, वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे, बहार नेचर फाऊंडेशनचे दीपक गुढेकर, जयंत सबाने, प्रा. किशोर वानखेडे, अतुल शर्मा, डॉ. लोकेश तमगिरे, अमोल मुनेश्वर यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.