आजपासून बारावीचा महासंग्राम; विद्यार्थी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:11 AM2019-02-21T00:11:45+5:302019-02-21T00:17:35+5:30
आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आयुष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) महासंग्राम गुरूवारपासून सुरु होत आहे. याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात ५१ परीक्षा केंद्रावरुन ही परीक्षा होणार आहे.
विज्ञान, कला व एमसीव्हीसीच्या १८ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला आहे. आता हे सर्व विद्यार्थी या महासंग्रामाला सामोरे जात आहेत.
बारावीच्या परीक्षेकरिता अकरावीत प्रवेश घेतल्यापासूनच पालकांसह विद्यार्थीही तयारीला लागतात. महाविद्यालय त्यानंतर शिकवणी वर्ग यातून वेळ काढून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करीत होते. विज्ञान शाखेच्या काही विद्यार्थ्यांनी केवळ महाविद्यायात प्रवेश नोंदवून दोन्ही वर्षे शिकवणीवर्गातच अभ्यास केला. प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी परीक्षेकरिताच त्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे विज्ञान शाखेला सक्तीची केलेली बायोमेट्रिक हजेरीही केवळ औपचारिकताच ठरली. अखेर बारावीच्या परीक्षेचा दिवस आला असून २१ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. दोन वर्षात केलेल्या अभ्यासाची परीक्षा तीन तासातच होणार असल्याने विद्यार्थीही जोमाने कामाला लागले आहे. आता यात कोण बाजी मारेल हे निकालावरून कळेल. परीक्षेच्या आदल्यादिवशी शुभेच्छांची आदान-प्रदान सुरू होती.
सहा भरारी पथकांचा राहणार वॉच
बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्ह्यात सहा भरारी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक जिल्ह्यातील ५१ परीक्षा केंद्रावर वॉच ठेवणार आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी निरंतर यांच्यासह जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे विशेष भरारी पथक, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांचे पथक व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाचा समावेश आहे.
परीक्षा केंद्राचे होणार चित्रीकरण
दहावी व बारावीच्या परीक्षेत यावर्षी कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या उद्देशाने प्रथमच शिक्षण विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्राचे बाहेरुन चित्रिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता परीक्षा केंद्राचीही जबाबदारी वाढली असून कॉपी बहाद्दरांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
शिक्षण मंडळाकडून हेल्पलाईन
दहावी व बारावी परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याना काही बाबींची माहिती अवगत व्हावी, यासाठी शिक्षण मंडळाने हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. २० फेब्रुवारी ते २२ मार्च या कालावधीत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळेल. ही हेल्पलाईन सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.