आजपासून आळीपाळीने कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:00 AM2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:15+5:30
कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध घालण्याकरिता शासनस्तरावरुनच खबरदारी घेतली जात असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यात आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यात एकही रुग्ण नसतांना केवळ सुरक्षा म्हणून जमावबंदी लागू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात ५० टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहण्याकरिता आळीपाळीने काजकाज करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनीही सर्व शासकीय कार्यालयाला यासंदर्भात निर्देश दिल्याने आजपासूनच शासकीय कार्यालयात आळीपाळीने कामकाज सुरु करण्यात आले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध घालण्याकरिता शासनस्तरावरुनच खबरदारी घेतली जात असल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही जिल्ह्यात आदेशांची अंमलबजावनी केली जात आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता जिल्ह्यात एकही रुग्ण नसतांना केवळ सुरक्षा म्हणून जमावबंदी लागू केली आहे. तसेच सर्वच जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद यासह सर्वच शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतांना ३१ मार्चपर्यंत येण्यास मनाई केली आहे. त्यांच्या काही तक्रारी व अत्यावश्यक प्रश्न असल्यास त्यांनी संबंधित शासकीय कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच कार्यालयीन कामकाज सुरु राहावे आणि कोरोनाचा संसर्गही टाळता यावा म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयात पन्नास टक्केच कर्मचारी उपस्थित राहतील. कार्यालय प्रमुखांनी पन्नास टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षात घेऊन जे शासकीय अधिकारी, कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ ईच्छितात, त्यांना ताताडिने रजा मंजूर करावी, तसेच या कालावधीत रजेचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर न करता परावर्तीत रजा सुध्दा मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ज्या कार्यालयतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या १० पेक्षा अधिक आहे, त्या कार्यालयातील विभाग प्रमुखांनी कार्यालयात आळीपाळीने कमीत कमी १० अधिकारी, कर्मचारी तसेच जास्तीत जास्त ५० टक्के प्रमाणे उपस्थिती राहील. शासकिय कामकाज पार पाडण्यास व्यत्यय निर्माण होणार नाही या दृष्टीने विभाग प्रमुखानी आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. रजेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपर्क पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी कार्यालयास उपलब्ध करुन घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना त्यासंदर्भात सूचना करुन आळीपाळीने कामाला सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची अंमलबजाणवी होत आहे, नागरिकांनीही सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याची गरज आहे.
शाळा, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना बंदी
शाळा, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळेत व कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. या कर्मचाऱ्यांनी स्वत:चे भ्रमणध्वनी, दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी व निवासाचा पत्ता कार्यालय प्रमुख किंवा मुख्याध्यापकांना द्यावा. मुख्याध्यापकांनी आवश्यक असेल तेव्हाच ज्या कर्मचाऱ्यांशी संबंधित कामे आहेत, त्यांनाच कार्यालयात पाचारण करावे, इतर आवश्यक सर्व कामे घरी राहून करावी. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम विभागीय शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. हा आदेश सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग तसेच आपत्कालीन व अत्यावश्यक सेवा देणाºया कार्यालयास लागू असणार नाही.
अधिकारी, कर्मचाऱ्यांची मुख्यालयाकडे पाठ
जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयात काम करणारे बहूतांश शासकीय अधिकारी, कर्मचारी व काही महाविद्यालयतील प्राध्यापकही दररोज नागपूर व यवतमाळ येथून ये-जा करतात. नागपूर व यवतमाळ या दोन्ही शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या शहरातून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपासूनही संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तरीही बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे.
झेडपीतील गर्दीवर नियंत्रणाची गरज
मिनिमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत जवळपास १५ विभागाव्दारे कामकाज चालते. येथे दररोज पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचीन ओम्बासे यांच्या सूचनेवरुन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अभ्यांगतांना ३१ मार्चपर्यंत येण्यास मनाई केली. सोबतच जमावबंदी कायद्यान्वये एका ठिकाणी पाच व्यक्तीच्यावर उपस्थित राहता येणार नाही, अशाही सूचना केल्या असून फलकही लावण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याच्या दृष्टीने आळीपाळीने कामकाजही सुरु केले आहे. मात्र, काही सभापतींच्या दालनामध्ये कार्यकर्ते व कंत्राटदारांची गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे सभापती व सदस्यांनीही कार्यकर्त्यांना सांगून सहकार्य करण्याची गरज आहे.
‘तो’ संदेश केवळ अफवाच
शहरालगतच्या एका शाळेतील शिक्षकाच्या मुलाला कोरोना झाल्याचा संदेश सोशल मीडियावर सकाळपासून फिरत होता. मात्र, जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण नसून तो संदेश केवळ अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णाचे नाव सार्वजनिक करणे किंवा सोशल मीडियावर अशा अफवा पसरविणे हा सायबर गुन्हा आहे. त्यामुळे अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनीही अशा अफवांना बळी न पडला अफवा पसरविणाऱ्यांची माहिती देण्यासाठी ०७१५२-२३२५०० या पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
गैरसोयीबाबत वराकडून दिलगिरी
देवळी: कोरोना प्रतिबंधाकरिता जिल्ह्यातील सर्व लग्नसोहळे व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार देवळीतील कुवारे व वडतकर परिवाराने घरीच लग्नसोहळा पार पाडला. या सोहळ्या वर-वधू परिवारातील प्रत्येक पाच सदस्य उपस्थित होते. नवरदेव मंगेश केशव कुवारे याने घरासमोरील मंडपाजवळ हातात बॅनर पकडून निमंत्रितांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.