आजच्या पिढीने वर्ध्याचा इतिहास देशपातळीवर न्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:45 PM2017-08-23T23:45:47+5:302017-08-23T23:46:29+5:30

महात्मा गांधी यांनी इंग्रजांना भारतातून जाण्यासाठी चले जावचा नारा दिला. त्याची बैठक वर्धा येथे झाली होती.

Today's generations take history of Wardha across the country | आजच्या पिढीने वर्ध्याचा इतिहास देशपातळीवर न्यावा

आजच्या पिढीने वर्ध्याचा इतिहास देशपातळीवर न्यावा

Next
ठळक मुद्देरामदास तडस संकल्प से सिद्धी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांनी इंग्रजांना भारतातून जाण्यासाठी चले जावचा नारा दिला. त्याची बैठक वर्धा येथे झाली होती. याच आंदोलनात आष्टी येथील स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पोलीस चौकीवर कब्जा केला. आष्टीच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तरूण पिढीने देशपातळीवर पोहोचविण्याचे काम करावे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
केंद्र शासन चले जाव चळवळींचा अमृत महोत्सव देशभर साजरा करीत आहे. यानिमित्ताने संकल्प से सिद्धी कार्यक्रमाचे जिल्हा परिषद सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा जुहीकर, सभापती निता गजाम, सोनाली कलोडे, जयश्री गफाट, मुकेश भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव उपस्थित होते.
खा. तडस पूढे म्हणाले की, ९ आॅगस्टला चले जाव चळवळीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र शासनाद्वारे २०२२ पर्यंत देशाच्या प्रत्येक नागरिकांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या विकासासाठी संकल्प करावा. सर्व जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन देश महासत्ता बनविण्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:चे घर व्हावे ही इच्छा असते. यासाठी केंद्र शासनाद्वारे २०२२ पर्यंत प्रत्येकाला स्वत:चे घर देण्यात येणार आहे. घर बांधकामासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात बांधकामाची रक्कम भेट जमा करण्यात येणार आहे. नागरिकांना पासपोर्टसाठी नागपूर येथे जावे लागते. केंद्राकडे पाठपुरावा केल्याने वर्धा येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली असून लवकरच ते सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन मडावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागाचा विकास करण्याचे ठरविले आहे. २०२२ पर्यंत नागरिकांचा विकास करण्याचे दायित्व स्वीकारले पाहिजे, असे आवाहनही केले.
यावेळी निता गजाम, कांचन नांदूरकर व विवेक इलमे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, जि.प. खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार, जि.प. सदस्यांची अनुपस्थिती
भारतात ९ आॅगस्ट १९४२ रोजी चले जाव चळवळ सुरू झाली. या चळवळीचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त २१ ते २५ आॅगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात पंचायत संमेलन घेण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले. यानुसार जिल्हा परिषदेत बुधवारी पंचायत संमेलन घेण्यात आले; पण वेळेवर कार्यक्रम आयोजित केल्याने निमंत्रण पोहोचू शकले नाही. यामुळे चार आमदारांसह जि.प. सदस्य कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
शासनाच्या पत्रातही चूक
देशात चले जावची चळवळ ९ आॅगस्ट १९४२ रोजी सुरू झाली. या चळवळीचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पत्र काढण्यात आले; पण राज्य सचिव असीम गुप्ता यांनी काढलेल्या पत्रात ९ आॅगस्ट १९४७ रोजी चले जावची चळवळ सुरू झाल्याचा उल्लेख केला आहे. शासनाच्या सचिवाकडून ही चुक झाल्याचे दिसते.

चारही आमदारांसह सर्व जि.प. सदस्यांना निमंत्रण देण्यात आले होते. सुकळी (स्टेशन) येथे कार्यक्रम असल्याने आ.डॉ. भोयर व काही सदस्य तिकडे होते. विरोधी गटातील सदस्यांनाही निमंत्रण दिले. तरी ते अनुपस्थित राहिले.
- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद, वर्धा.

Web Title: Today's generations take history of Wardha across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.