आजपासून प्रचाराचा नवरात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:04 PM2019-03-13T22:04:17+5:302019-03-13T22:05:17+5:30
जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र बुधवारी दुपारी स्पष्ट झाले. उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्याने उमेदवार आता प्रचाराच्या तयारीला लागले आहे. गुुरुवारपासून गावागावांत प्रचारतोफा धडकणार असल्याने नऊ दिवस-रात्र चालणाऱ्या या प्रचारातून मतदारांना आकर्षीत करण्याकरिता उमेदवारांनी रणनिती आखली आहे. या प्रचारतोफा २२ मार्चला रात्री थंडावणार असून उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचेही पालन करावे लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र बुधवारी दुपारी स्पष्ट झाले. उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आल्याने उमेदवार आता प्रचाराच्या तयारीला लागले आहे. गुुरुवारपासून गावागावांत प्रचारतोफा धडकणार असल्याने नऊ दिवस-रात्र चालणाऱ्या या प्रचारातून मतदारांना आकर्षीत करण्याकरिता उमेदवारांनी रणनिती आखली आहे. या प्रचारतोफा २२ मार्चला रात्री थंडावणार असून उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचेही पालन करावे लागणार आहे.
जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर २६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूका येत्या २४ मार्चला होऊ घातल्या आहे. ५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असून यावर्षी पहिल्यांदाच सरपंचपदाकरिता थेट निवडणूक होत असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारावर भर दिल्या जात आहे. ९ मार्चला नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. अंतिम तारखेपर्यंत २९८ सरपंचपदाकरिता १ हजार ४१६ तर ९४६ प्रभागातील सदस्यपदाकरिता ५ हजार ९०७ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. ११ मार्चला या अर्जाची छाननी करण्यात आली. वर्धा तालुका वगळता सरपंचपदाचे ११ तर सदस्यपदाचे ५० अर्ज बाद करण्यात आले. १३ मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने दुपारी तीन वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरु असल्यामुळे उमेदवारांची अंतिम आकडेवारी मिळू शकली नाही. परंतू उमेदवारी निश्चित झाली आणि निवडणूक चिन्हही मिळाल्याने उमेदवारांनी सायंकाळपासूनच प्रचार सहित्यासाठी धडपड सुरु केली.
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाई
ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजताच जिल्ह्याभरात आदर्श आचारसहिता जाहीर झाली. तसेच आता लोकसभा निवडणुकीचीही आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या काळात ग्रामपंचायतच्या उमेदवारांना प्रचार करताना या आचारसहितेचे पालन करावे लागणार आहे.
रात्री दहा ते सकाळी सहा वाजतापर्यंत प्रचाराकरिता भोंग्याचा आवाज करता येणार नाही. तसेच प्रचार साहित्याचा वापर करताना काळजी घ्यावी लागणार आहे. फलक लावताना घरमालकाची परवानगी आवश्यक असून सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
दररोज होणाऱ्या खर्चाचा तपशील तहसील कार्यालयात सादर करावयाचा आहे. असे असतानाही एखाद्या उमेदवाराने आचारसहितेचे उल्लंघन केल्यास तक्रार झाल्यावर त्या उमेदवारावर कारवाई करण्याचेही निर्देष निवडणूक आयोगाने दिले आहे.
सरपंचपदाचे चिन्ह सदस्यांना नाही
जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदाच सरपंचपदाकरिता थेट निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकरिता सरपंच व सदस्यपदाच्या उमेदवारांकरिता ४८ मुक्त चिन्ह देण्यात आले आहे. सरपंचाला जे चिन्ह मिळाले असेल ते चिन्ह गावातील इतर सदस्यांना मिळाले नाही. तसेच सरपंचपदाचा उमदेवार जर सदस्य म्हणूनही रिंगणात असेल तर त्याला दोन्ही पदाकरिता एकच चिन्ह देण्यात आले आहे. नामांकन अर्जाच्या प्राधान्यानुसार उमेदवाराला पसंतीचे चिन्हही मिळाले आहे. आज चिन्ह वाटप असल्याने आठही तालुक्यातील तहसील कार्यालयात उमेदवारांसह समर्थकांची चांगलीच गर्दी उसळली होती.
सरपंच व सदस्यांना निवडणूक खर्चाची मर्यादा
निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च केल्या जातो. विशेषत: यावर्षी निवडणूक ही होळी झाल्यानंतर दोन दिवसांनी असल्याने उमेदवारांचा खिसा खाली करण्याची संधी काही मतदार सोडणार नाही. पण, निवडणुकीकरिता उमेदवारांना आयोगाकडून खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे. ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या उमदेवाराला ५० हजार रुपये तर सदस्याला २५ हजार, ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ठिकाणी १ लाख रुपये तर सदस्याला ३५ हजार रुपये तसेच १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाच्या उमेदवाराला १ लाख ७५ हजार रुपये तर सदस्याला ५० हजार रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे.
वर्धा तालुक्यातील आकड्यांचा खेळ कायम
वर्धा तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाकरिता तसेच १९६ प्रभागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे सरपंच पदाकरिता ३०९ तर सदस्यांसाठी १ हजार ४६८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. छाननीअंती किती अर्ज बाद ठरविले याची माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली नाही. बुधवारीही ही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.