न्यूनगंडाचा दृष्टिकोन बदलण्याची आज गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:04 PM2019-02-14T22:04:59+5:302019-02-14T22:05:18+5:30
मानवाची निर्मिती ही स्त्री व पुरुष अशी जन्मजात केली आहे. त्यामुळे स्त्रियांना किंवा पुरूषांना त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात ओळख प्राप्त झाली आहे. मात्र, एखाद्याने जन्मजात मिळालेल्या शरीराच्या अवयवात बदल करून जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला समाजमान्यता मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मानवाची निर्मिती ही स्त्री व पुरुष अशी जन्मजात केली आहे. त्यामुळे स्त्रियांना किंवा पुरूषांना त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात ओळख प्राप्त झाली आहे. मात्र, एखाद्याने जन्मजात मिळालेल्या शरीराच्या अवयवात बदल करून जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला समाजमान्यता मिळत नाही. किंबहुना, समाजाचा अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मात्र, शरीरात बदल केल्यानंतर समाजासमोर वावरणाऱ्या ट्रान्सजेंडरला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशीच एक ट्रान्सजेंडर २०१८ ची मिस ट्रान्स क्विन इंडिया मीना शेंदरे येथील कुंभलकर कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे आली. ती-तो कशी दिसते, हे बघण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची अलोट गर्दी उसळली. विशेषत: तरुणांची संख्या अधिक होती. यावेळी ती आली...मिसळली ...आणि जिंकली सुद्धा... तिने उपस्थितांसोबत संवाद साधला... आणि बघता-बघता तिने साºयांचीच मने जिंकली.
तिच्या संवादानंतर ज्यांचा तिच्याकडे बघण्याचा जो न्यूनगंड होता, तो बदलला. परिणामी, ज्या समाजाने तिची एकप्रकारे अवहेलना केली, त्या समाजात तिला ताठ मानेने जगण्याची हिंमत कुंभलकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली. निमित्त होते महाविद्यालयात आयोजित ‘ट्रान्सजेंडर -मते मतांतरे’ विषयावरील कार्यशाळेचे. छत्तीसगड-रायपूर येथील ट्रान्सजेंडर मीना शेंदरे यांनी विद्यार्थ्यांसोबतच महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी सोबत मनमोकळी चर्चा केली.
स्वत:ची लैंगिक ओळख ही शारीरिक लिंगाशी न जुळणाºया व्यक्तीला परलैंगिक असे म्हणतात. उदा. शारीरिक पुरुष असून स्त्री आहे, असे वाटणारी व्यक्ती किंवा शारीरिक स्त्री असून पुरुष आहे, असे वाटणारी व्यक्ती. अशा व्यक्तीला कुठल्याही लिंगाच्या व्यक्तीशी लैंगिक आकर्षण असू शकते. यावेळी मिस ट्रान्स क्विन मीना यांनी लहानपणापासून मुलगा असून सुद्धा स्त्रीत्वाच्या ओढीमुळे घरातील लोकांसोबत संघर्ष करून, त्यांची मते परिवर्तन करून ट्रान्सजेंडर करून घेतल्याची आपली कहाणी व जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगी आलेले अनुभव कथन केले.
रायपूर येथे राहात असलेल्या ट्रान्स क्विन मीना यांनी २०१३ ला सर्वप्रथम मिस इंदौर श्री, मिस सेंट्रल इंडिया छत्तीसगढ २०१८ आणि मिस ट्रान्सजेंडर इंडिया २०१८ चा खिताबदेखील मिळविला आहे. ती एक मॉडेल, प्रोफेश्नल बेली डान्सर आणि मेकअप आर्टिस्ट असून भविष्यात भारतातील सामाजिक परिवर्तन कार्यात सहभागी राहणार असल्याचे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, डॉ. अरविंद घोंगडे, प्रा.विलास बैले, प्रा.अशोक सातपुते, डिसेंटकुमार साहू, सुधीरकुमार यांचे महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.