आजच्या काळात जल संधारणापेक्षा मन संधारणाची गरज

By admin | Published: September 21, 2016 01:11 AM2016-09-21T01:11:54+5:302016-09-21T01:11:54+5:30

समाज हे एक भांडे आहे, जे पाणी एकत्रित करते. यामुळे पाणी वाचविण्यासाठी लोकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.

Today's need for mind-management is beyond water conservation | आजच्या काळात जल संधारणापेक्षा मन संधारणाची गरज

आजच्या काळात जल संधारणापेक्षा मन संधारणाची गरज

Next

सत्यजीत भटकल : भारतीय जैन संघटना व पाणी फाऊंडेशनद्वारे जनजागृती कार्यक्रम
वर्धा : समाज हे एक भांडे आहे, जे पाणी एकत्रित करते. यामुळे पाणी वाचविण्यासाठी लोकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. पाणी हेच जीवन आहे, आता हे सिद्ध करण्याची गरज राहिली नाही. पाण्याचे संवर्धन केले तर किती तरी पाणी शेती पर्यंत पोहचविता येईल. गाव सशक्त करता येईल. या चळवळीत लोक सहभाग वाढविण्याची गरज आहे. यामुळे आजच्या काळात जल संधारणापेक्षा मन संधारणाची गरज आहे, असे प्रतिपादन 'सत्यमेव जयते' मालिकेचे दिग्दर्शक आणि पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकल यांनी केले.
भारतीय जैन संघटनेच्या जिल्हा शाखा आणि वर्धा चॅप्टरच्या वतीने अनेकांत स्वाध्याय मंदिरात जलसंवर्धन विषयावर स्लाईड शो आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय जल निती आयोगाचे सदस्य माधव कोटस्थाने, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अमर गांधी, कार्यक्रमाचे समन्वयक अनिल फरसोले, जिल्हाध्यक्ष मनोज श्रावणे, वर्धा चॅप्टरचे अध्यक्ष अभिषेक बेद आदी उपस्थित होते. भारतीय जैन संघटना आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वर्धा तालुक्यातील काही गावांची निवड करून जल संवर्धनाच्या क्षेत्रात भरीव काम करण्यात येणार आहे. शुभांगी विटाळकर, अर्चना भागवतकर, स्वाती ढोबळे यांनी सादर केलेल्या मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत राजेंद्र डागा, प्रसेन संकलेचा, कोषाध्यक्ष विपीन चोरडिया, विनोद ढोबळे, मनीष पांडे, अशोक सावळकर यांनी केले. प्रास्ताविकातून अनिल फरसोले यांनी पाणी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी भटकल यांनी स्लाईड शो आणि चल चित्रफितीच्या माध्यमातून पाणी हेच जीवन आहे, त्याचे संवर्धन करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले कार्य याविषयी माहिती दिली.
कोटस्थाने म्हणाले, पाण्याचे महत्त्व सगळ्यांना कळले आहे. शासन स्तरावरही जल संवर्धनासाठी भरीव काम होत आहे. अशा परिस्थितीत लोक सहभागातून सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जर काम झाले तर गाव सशक्त बनेल. ६० वर्षात हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. कार्यक्रमाचे संचालन वर्धा चॅप्टरचे सचिव राजेश भुसारी यांनी केले. आभार बेद यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

सत्यमेव जयते वॉटर कप
अभिनेता आमीर खानच्या प्रेरणेने स्थापित झालेल्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने गावांसाठी सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ३० तालुक्यात जल संवर्धनाचे भरीव काम करणाऱ्या ग्राम पंचायतींची या कपसाठी निवड करण्यात येणार आहे.
गत वर्षी केवळ तीन तालुक्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गावाला ५० लाख रुपये, द्वितीय ३० आणि तृतीय २० लाखांचे पुरस्कार देण्यात आले होते. मात्र आता त्याची व्याप्ती वाढवून राज्यातील ३० तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. यात सुमारे ८० लाख नागरिकांना सहभाग असणार आहे. या गावांमध्ये लोक सहभागातून जल संवर्धनाची काम केली जाणार आहे. याद्वारे टँकरमुक्त व दुष्काळमुक्त राज्य बनविण्याकडे वाटचाल करण्यात येत असल्याची माहिती सत्यजीत भटकल यांनी यावेळी दिली.
 

Web Title: Today's need for mind-management is beyond water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.