आजचा व्यवहार कालच्या तारखेत
By Admin | Published: July 2, 2017 01:12 AM2017-07-02T01:12:01+5:302017-07-02T01:12:01+5:30
देशात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला. एक देश एक कर ही पद्धत लागू झाल्यानंतर
जीएसटीचा पहिला दिवस : बाजारात स्थिती साधारणच; समज-गैरसमजाचा गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला. एक देश एक कर ही पद्धत लागू झाल्यानंतर बाजारात शनिवारी परिस्थिती मात्र साधारणच होती. सध्या येथील व्यावसायिकांकडून जुन्याच वस्तूंची विक्री होत असल्याने सध्या जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली नसल्याचे दिसून आले आहे. तर काहींकडून आज कालच्याच तारखेत व्यवहार केल्याची कबुली दिली.
जीसटी लागू करण्याचा निर्णय झाला त्या काळापासूनच या करासंदर्भात अनेक समज गैरसमज पसरत गेले. या संदर्भात आताचा सेवा व वस्तू कर आणि पूर्वीचा विक्रीकर विभागाच्यावतीने नागरिकांत जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नादरम्यान या करासंबंधात मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज निर्माण झाले होते. असे असले तरी सर्वसामान्यांना यात लाभ होणार असे म्हणत शासनाने या कराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. काही व्यापाऱ्यांकडून या कराचा राज्य स्तरावर विरोध करण्यात येत आहे. असे असले तरी त्याची अंमलबजावणी करणे आता सक्तीचे झाले आहे.
जीएसटीची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयामुळे बाजारात काही प्रमाणात फरक पडेल असे वाटत असताना वर्धेत मात्र स्थिती सर्वसाधारण असल्याचे दिसून आले आहे. येथील व्यापाऱ्यांकडून आज जुन्याच पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले. यात सर्वाधिक परिणाम औषधी विक्रेत्यांकडून कालच्या तारखेत आजचे काम सुरू असल्याचे दिसून आले. कपडा व्यापाऱ्यांकडूनही आज जुन्याच पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून आले. ज्या प्रमाणात जीएसटीची चर्चा झाली त्या प्रमाणात त्याचा विशेष परिणाम बाजारात दिसून आला नाही. मात्र या करामुळे सेल बंद झाल्याचे दिसून आले.
नोंदणीकरिता तीन महिन्यांचा
वाढीव कालावधी
देशात १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. या तारखेच्या आत सर्वच कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांनी जीसटी क्रमांक घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र नित्याप्रमाणे शासनाची वेबसाईट कामाच्या वेळी जाम होत असल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. यात अनेकांची नोंदणी रखडली होती. या व्यापाऱ्यांकडून आणखी तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या काळात नोंदणीपासून वंचित राहणाऱ्या व्यापाऱ्यांनी नोंदणी होणे अनिवार्य आहे.
विक्रीकर कार्यालय झाले वस्तू व सेवा कर कार्यालय
आतापर्यंत विक्रीकरण कार्यालय म्हणून कार्यालय कार्यरत असलेले विक्रीकर कार्यालयाचे आजपासून नाव बदलले आहे. आता हे कार्यालय वस्तू व सेवा कर कार्यालयाच्यावतीने ओळखले जाणार आहे. तसे नामकरण करून त्याचे रितसर लोकार्पण राज्य सहायक राज्यकर आयुक्त दामले यांच्या हस्ते करण्यात आले.
विमा एजंटांकडून निदर्शने
येथील भातीय जीवन विमा निगमच्या काही एजंटांकडून कार्यालयाच्या परिसरात विम्यावर आकारण्यात येत असलेल्या जीएसटीचा विरोध दर्शवित निदर्शने केली. विशेष म्हणजे या निदर्शनात काहीच एजंट समाविष्ट असल्याचे दिसून आले.
१५ करांऐवजी एकच कर
केंद्र आणि राज्य शासनाचे वस्तू आणि सेवा संबंधित अप्रत्यक्ष कर एकत्रित कर एकत्रित केले जातील. केंद्रीय उत्पादन शुल्क (सेंटर एक्सीस ड्युटी), अतिरिक्त उत्पादन शुल्क (अॅडीशनल ड्युटी आॅफ एक्सीस), सेवाकर (सर्व्हीस टॅक्स), अतिरिक्त सीमा शुल्क (अॅडीशनल ड्युटी आॅफ आय.इ.सीवीडी), विशेष अतिरिक्त सीमा शुल्क (एसएडी), अधिभार आणि सेस केंद्र शासनाचे अप्रत्यक्ष कर आहेत. तर मुल्यवर्धित कर (वॅट), केंद्रीय विक्री कर (सीएसटी), करमणूक कर, ऐषआराम कर, लॉटरी कर, ऊस खरेदी कर, प्रवेश कर, स्थानिक संस्था कर, जकात हे राज्य शासनाचे अप्रत्यक्ष कर आहेत. हे सर्व कर जीएसटीमध्ये अंतर्भूत करण्यात येतील. यामुळे नागरिकांची या सर्वच करांतून सुटाका होणार असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.