शौचालय, वृक्षारोपणात गैरप्रकार
By admin | Published: March 3, 2017 01:49 AM2017-03-03T01:49:32+5:302017-03-03T01:49:32+5:30
धानोली (मेघे) येथील वृक्ष लागवड आणि संगोपनात सरपंच व सचिवाने गैरप्रकार केला आहे.
धानोली (मेघे) ग्रा.पं.चा प्रताप : सार्वजनिक नळांतून वाहते पाणी
सेलू : धानोली (मेघे) येथील वृक्ष लागवड आणि संगोपनात सरपंच व सचिवाने गैरप्रकार केला आहे. शिवाय शौचालय बांधकामात नियम धाब्यावर बसवून एकाच घरी दोनदा तर काही लाभार्थ्यांच्या जुन्याच शौचालयाला नव्याने बांधल्याचे दाखवून अनुदान मंजुर केले. त्या अनुदानात ‘अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’, असा खेळ केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काही लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ देताना टाके न बांधता दुसऱ्याच्या टाक्याला पाईप जोडून काम केले. असे असताना अनुदानाची रक्कम देण्यात आली. एका ग्रामपंचायत सदस्याने निवडणुकीचे नामांकन भरताना शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. निवडून आल्यानंतर त्या सदस्याच्या घरी शौचालयच नव्हते. सरपंच व सचिवाने नियम धाब्यावर बसवून शौचालय बांधकामाच्या यादीत त्याचे नाव टाकून अनुदानही मिळवून दिले.
तालुक्यात शौचालय बांधकामात सर्वाधिक खोटेपणा धानोली गावात झाला. वृक्ष लागवडीच्या नावावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावावर बँक खात्यात मजुरीची रक्कम पाठविण्यात आली. नाममात्र रक्कम बोगस मजुरांना देऊन सचिव एस.के. फरदळे व सरपंच रामू पवार यांनी उर्वरित रक्कम गिळंकृत केल्याचा आरोप माजी सरपंच महेंद्र किन्नाके, माजी उपसरपंच दिलीप भजभुजे, माजी ग्रा.पं. सदस्य सुधाकर लोहकरे, प्रभा किन्नाके, माजी उपसरपंच अरुण बाचले यांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धानोली गावाला भेट देत कामावर नसलेल्या मजुरांच्या नावाने मजुशी कशी काढण्यात आली, याची शहानिशा करावी. चांगल्या योजनेला सुरूंग लावणाऱ्या या सरपंच व सचिवावर कठोर कारवाई करावी. शासकीय निधीचा दुरूपयोग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हजारो वृक्ष लावल्याचे दाखविले; पण जिवंत २०० ही नाही. तीन वर्षांत वर्षात अनावश्यक खर्च झालेली रक्कम ग्रामसेवक व सरपंचाकडून वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
घरगुती नळांवर लावले ग्रामपंचायतीने मीटर
ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजना योग्यरित्या कार्यान्वित व्हावी, पाण्याचा अपव्यय होऊ नये, ग्रामस्थांकडून पाण्याचा मोबदला वसूल करता यावा म्हणून घरगुती नळांवर मिटर बसविण्यात आले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना वापरलेल्या पाण्याबाबत देयक देऊन वसुली केली जात आहे. पाणी पुरवठा ही सुसूत्रता आणत असताना सार्वजनिक नळांना मात्र तोट्याही बसविण्याचे सौजन्य ग्रा.पं. प्रशासनाने दाखविले नाही. गावातील वार्ड क्रमांक ३ मध्ये सार्वजनिक नळांना तोट्या नसल्याने पाणी धो-धो वाहताना दिसते. शिवाय सार्वजनिक नळांच्या खाली सिमेंटचा चबुतराही तयार करण्यात आलेला नाही. यामुळे त्या भागात चिखल साचला असून ग्रामस्थांना दूषित पाणी भरावे लागत आहे. याकडे लक्ष देत सार्वजनिक नळांना तोट्या लावणे गरजेचे आहे.
घाणीच्या साम्राज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात
ग्रा.पं. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून पाणी वाहते. वॉर्ड क्र. ३ मध्ये सार्वजनिक नळाखाली सिमेंट तळ नसल्याने डबके साचते. तेथील पाण्यात भांडे ठेवून महिला पाणी भरतात. याबाबत ग्रामसेवक फरदळे यांनी आठ दिवसांत दुरूस्ती करून देतो, असे त्या वसाहतीत जाऊन नागरिकांना सांगितले होते; पण भ्रष्टाचारात हात धुण्यात तरबेज असलेल्या ग्रामसेवकाने शब्द पाळला नाही. कुणाचा दूषित पाण्याने जीव गेल्यास सरपंच व सचिव जबाबदार राहतील, असा इशाराही तेथील ग्रामस्थांनी दिला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.