उद्या ‘ते’ गांधींनाही देशद्रोही ठरवतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:18 PM2017-12-26T22:18:50+5:302017-12-26T22:19:01+5:30
सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. त्यामुळे विकासाच्या बाता करणारी मंडळी उद्या महात्मा गांधींनाही देशद्रोही ठरविण्यास कमी करणार नाहीत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले. यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे आयोजित डॉ. भा.ल. भोळे स्मृती पुरस्कार वितरण समारोहात ते बोलत होते.
स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या समारोहात डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांना ‘मूल्यभानाची सामग्री’ या ग्रंथाकरिता डॉ. भा.ल. भोळे स्मृती वैचारिक ग्रंथ पुरस्कार प्रदान केला. ‘आंदोलन’ मासिकाच्या संपादक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनिती सुलभा रघुनाथ, पुणे यांना डॉ. भा.ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर औरंगाबाद येथील प्रा. राहुल कोसंबी यांना डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. जोशी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विचारपीठावर पुरस्कार समितीचे संयोजक किशोर बेडकीहाळ, विजया भोळे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, सहसचिव प्रा. राजेंद्र मुंढे यांची उपस्थिती होती.
सध्याचा काळ हा सांस्कृतिक उदात्तीकरण करण्याचा आहे. त्यातून संस्कृतीच्या पोटात काय दडले आहे, हे कळत नाही. संस्कृती ही बाजारात मिळण्याइतपत सुमार गोष्ट झाली आहे, असे मनोगत डॉ. थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. जात, धर्म, लिंग यावर नवा फॅसिझम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. अशावेळी पुन्हा एकदा सर्वांनी मिळून लढण्याची गरज आहे, अशी भूमिका सुनीती सु.र यांनी मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. पुरस्कृत व्यक्तींच्या निवडीमागील निकष व परिचय किशोर बेडकिहाळ व चैत्रा रेडकर यांनी करुन दिला. संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले. सन्मानपत्रांचे वाचन डॉ. राजेंद्र मुंढे, रंजना दाते व संजय इंगळे तिगावकर यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले. कार्यक्रमाला अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. विलास देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके, अनिल नितनवरे, हिरण्मय भोळे, डॉ. विलास देशमुख, डॉ. तारक काटे, देवराव कासटवार, गुणवंत डकरे, डॉ. गजानन कोटेवार, अभ्युदय मेघे, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा.प्रल्हाद इंगळे, प्रा. येऊलकर, डॉ. वंदना फरसोले, महेश मोकलकर आदी उपस्थित होते.