आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:01 PM2019-06-08T22:01:04+5:302019-06-08T22:01:28+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. शनिवारी सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओम रवींद्र झाडे याने ९८.४० टक्के गुण घेऊन वर्धा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

Topics in the Om Plant District of Arvi Vidyankiten | आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

आर्वीच्या विद्यानिकेतनचा ओम झाडे जिल्ह्यात टॉपर

googlenewsNext
ठळक मुद्देआर्वीची देवयानी डहाके व वर्ध्याची राधिका राठी द्वितीय स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. शनिवारी सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ओम रवींद्र झाडे याने ९८.४० टक्के गुण घेऊन वर्धा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
ओम झाडे हा आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी आहे. तर याच हायस्कूलमधील देवयानी कुंभराज डहाके आणि वर्धा शहराशेजारी असलेल्या पिपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलच्या राधिका सुनील राठी या दोन्ही विद्यार्थिनींनी ९७.८० टक्के असे समान गुण घेऊन वर्धा जिल्ह्यातून द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे. तर जिल्ह्यात तृतीयस्थानी महक अवतारसिंग गुरूनासिंघानी ही विद्यार्थिनी राहिली. ती विद्या निकेतन इंग्लिश हायस्कूल आर्वी येथील विद्यार्थिनी असून तिने ९७.६० टक्के गुण घेतले आहे. वर्धा जिल्ह्याचा निकाल यंदा ६५.०५ टक्के लागला आहे. वर्धा जिल्ह्यातील २८३ शाळांमधून एकूण १७ हजार २४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केला होता. त्यानंतर त्यापैकी १६ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ११ हजार ९ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादित केले आहे.

‘ओम’ला व्हायचंय केमिकल इंजिनिअर
दहावीच्या परीक्षेत ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावणाºया ओम झाडे याला केमिकल इंजिनिअर व्हायचे आहे. रसायनशास्त्राची विशेष आवड असलेला ओम नियमित चार तास अभ्यास करायचा. ओमचे वडील रवींद्र झाडे हे शिक्षक असून ते विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवितात. उत्कृष्ट चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी परिसरात ओळख आहे. तर ओमची आई संध्या या गृहिणी आहेत. ओम याला चित्रकला व क्रिकेट यात विशेष रूची आहे.

आठही तालुक्यात वर्धा अव्वल
जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास वर्धा तालुका हा दहावीचा उत्कृष्ट निकाल देण्यात अव्वल राहिला आहे. वर्धा तालुक्यातील ४ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ३ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादित केल्याने वर्धा तालुक्याचा टक्का ७१.८८ इतका राहिला. तर देवळी तालुक्यात २ हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा देत १ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्याने देवळी तालुक्याचा टक्का ६४.३२ राहिला. सेलू तालुक्याचा निकाल ५७.३० टक्के लागला. या तालुक्यातून १ हजार ५६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. तसेच आर्वी तालुक्यातील १ हजार ९०४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. परिणामी, आर्वी तालुक्याचा निकाल ६२.७१ टक्के राहिला. आष्टी तालुक्यातील ८२९ विद्यार्थ्यांपैकी ५०० विद्यार्थ्यांनी यश संपादित केल्याने आष्टी तालक्याचा निकाल ६०.३१ टक्के राहिला. तर कारंजा तालुक्याचा निकाल ६७.६१ टक्के लागला. या तालुक्यातून १ हजार १२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. हिंगणघाट तालुक्याचा निकाल ६६.४० टक्के लागला. या तालुक्यातून ३ हजार २१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार १३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. तसेच समुद्रपूर तालुक्यातील १ हजार २५८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ६७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश प्राप्त केले. त्यामुळे समुद्रपूर तालुक्याचा निकाल ५३.६५ टक्के राहिला.

तीन शाळांना भोपळा
वर्धा जिल्ह्यातील २४ शाळांनी १०० टक्के निकाल देऊन यशाची परंपरा कायम राखली आहे. असे असले तरी वर्धा जिल्ह्यातीलच तीन शाळांमधील एकही विद्यार्थी पार होऊ शकला नसल्याचे वास्तव निकालानंतर पुढे आले आहे. यात आर. के. कुरेशी उर्दू हायस्कूल आर्वी, नगर परिषद हायस्कूल पुलगाव आणि हिंगणघाट येथील भारत दिनांत हायस्कूलचा समावेश आहे.

राधिकाला डॉक्टर व्हायचंय
दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण घेत घवघवीत यश संपादित करणाºया राधिका सुनील राठी हिला डॉक्टर व्हायचे आहे. ती सध्या नीटच्या परीक्षेची तयारी करीत आहे. राधिकाचे वडील सुनील राठी हे देवळी येथील एसएसएनजे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहे. राधिकाच्या मोठ्या बहिणीने बीटेक केले आहे. आई-वडिलांसह तिचे राधिकाला मार्गदर्शन लाभते. राधिकाला गायनासह चित्रकलेचा छंद आहे. विशेष म्हणजे, राधिका ही वर्ग आठवीचे शिक्षण घेत असताना तीने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले होते.

Web Title: Topics in the Om Plant District of Arvi Vidyankiten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.