साटोडा ग्रा.पं.त तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:46 PM2019-06-16T23:46:01+5:302019-06-16T23:46:33+5:30
शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उपोषणाच्या सांगतेच्या दिवशीच रात्री हा प्रकार घडल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. उपोषणाच्या सांगतेच्या दिवशीच रात्री हा प्रकार घडल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला पेव फुटले असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
सदस्य कुणाल बावणे यांनी साटोडा ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन, पत्र किंवा कोणतीही माहिती न देता ११ जूनपासून अवैध मार्गाने जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले. त्यांच्या पाच मागण्या होत्या. त्यामध्ये स्वत: च्या घरासमोरील रस्ता ४ मीटर रुंद (१५ फूट) बनविण्यात यावा यासह अन्य मागण्या होत्या. केवळ स्वत:च्या घरासमोर १० लाख रुपये खर्चून रस्ता बांधकामाकरिता बावणे यांनी उपोषण केले. ग्रामपंचायतीकडे वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविणे, मासिक सभेत गोंधळ घालणे, प्रोसिडिंगवर स्वाक्षरी न करणे, यामुळे ग्रामपंचायतीचे वातावरण विस्कळीत झाले आहे, असे बयान ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशीमध्ये दिले. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल उपमुख्य अधिकारी यांना सादर केला. त्यामध्ये पाचही मागण्या निरर्थक निघाल्या. सरपंचांवर लावलेले सर्व आरोप निराधार निघाले, त्यांना तत्काळ उपोषण सोडण्यास सांगण्यात आले, अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली. याच दिवशी रात्री ९.३० च्या दरम्यान दोन व्यक्तींनी ग्रामपंचायत कार्यालयात जात दगडफेक केली. रॉडने खिडकीच्या काचा फोडल्या. कार्यालय बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून उपोषणकर्त्यांचा या घटनेशी संबंध जोडला जात आहे.
वारंवार केली जाणारी बदनामी व अन्य प्रकाराविरुद्ध उपोषणात सहभागी असलेल्या सदस्यांवर मानहानीचा दावा करणार आहे. तसेच पोलिसांतही तक्रार दाखल करू.
-प्रीती शिंदे, सरपंच, साटोडा.