शेतीच्या वादातून महिन्याभरात दोघांना केले ‘खल्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 12:49 PM2021-10-29T12:49:22+5:302021-10-29T14:59:39+5:30

शेतीच्या सातबारावर असलेल्या कुळाच्या नावावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला. एका महिन्याच्या कालावधीत शेतीच्या वादातून दोघाजणांची हत्या करण्यात आली.

tow people murdered due to dispute of farm land | शेतीच्या वादातून महिन्याभरात दोघांना केले ‘खल्लास’

शेतीच्या वादातून महिन्याभरात दोघांना केले ‘खल्लास’

Next
ठळक मुद्दे‘मधुकर’ हत्याप्रकरणात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : शेतीच्या वादातून घोराड गावात दोघांना आपला जीव गमवावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आणि २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास दोघांची शेतीच्या वादातून हत्या झाल्याचे समोर आल्याने आता शेतीचा वाद विकोपाला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोहणे आणि तेलरांधे या दोन कुटुंबांत २५ सप्टेंबर रोजी शेतीच्या सातबारावर असलेल्या कुळाच्या नावावरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला. यात वसंता पोहाणे याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात तेलरांधे कुटुंबच कारागृहात डांबले गेले. या घटनेला अवघा एक महिना पूर्ण होत नाही तोच एकाच कुटुंबात असणाऱ्या चुलत भावांमध्ये शेतात जाण्याचा रस्त्याच्या वादातून अनेक वेळा वाद झाले. त्यानंतर हा रस्त्याचा वाद तहसीलमध्ये गेला. यात तहसीलदारांनी शेतात जाण्याचा मार्ग मोकळा केला असला तरी जेथून रस्ता दिला त्या रस्त्याची वाट खुली झालीच नाही. यावरून काही वर्षांपासून असलेल्या वादाचे रूपांतर अखेर मधुकरच्या हत्येत झाले. मधुकर चिंतामण खराबे याला रॉडने मारहाण करीत त्याची हत्या करण्यात आली.

अवघ्या महिनाभरात झालेल्या दोन्ही हत्याकांडांमुळे परिसराला हादरा बसला. मधुकरच्या पत्नीलाही जबर मार लागल्याने ती सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणात सुरेश खराबे त्यांची पत्नी, मुलगा ,मुलगी व पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कोहळे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, वरठी, अमोल राऊत करीत आहे.

दोन्ही कुटुंबांतील सदस्य गजाआड

एका महिन्याच्या कालावधीत शेतीच्या वादातून दोघाजणांची हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्याकांडांत दोन्ही कुटुंबांतील सदस्य गजाआड झाल्याने गावात घडत असलेल्या या प्रकरणामुळे हळहळ व्यक्त होत आहे; तर शेताचा व घरगुती वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी तक्रारीनंतर लवकरच प्रशासनाने पावले उचलली तर अनुचित प्रकार घडणार नाही, अशी चर्चाही आता गावात होऊ लागली आहे.

Web Title: tow people murdered due to dispute of farm land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.