‘ट्रेडल पाणी पंप’ ने दिला २४० महिलांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:11 PM2018-03-22T22:11:41+5:302018-03-22T22:11:41+5:30

वीज पुरवठा नसला, इंधनासाठी पैसे नसले तर शेतातील पिकांचे ओलित थांबत होते. यावर मात करण्यासाठी मानव चलित पंप ही संकल्पना समोर आली.

'Trade Waters Pump' gave 240 jobs to women | ‘ट्रेडल पाणी पंप’ ने दिला २४० महिलांना रोजगार

‘ट्रेडल पाणी पंप’ ने दिला २४० महिलांना रोजगार

googlenewsNext
ठळक मुद्देसात महिलांनी घेतले प्रशिक्षण : महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद प्रकल्पाचा उपक्रम

प्रशांत हेलोंडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : वीज पुरवठा नसला, इंधनासाठी पैसे नसले तर शेतातील पिकांचे ओलित थांबत होते. यावर मात करण्यासाठी मानव चलित पंप ही संकल्पना समोर आली. या ट्रेडल पंपाच्या निर्मितीतून वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. अत्यंत कमी खर्चात हा पंप शेतकºयांना उपलब्ध होत असल्याने सिंचनात वारंवार निर्माण होणारे अडथळेच दूर झाल्याचे दिसून येत आहे.
मागील काही वर्षांपासून बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची मोहीम सुरू आहे. यासाठी शासनाने ग्रामीण जीवनोन्नती अभियानही राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत जिल्ह्यात उमेद प्रकल्पांतर्गत अनेक महिलांना रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वर्धा तालुक्यातील रोठा येथील २४० महिलांच्या तेजस्विनी ग्रामसेवा संघाला यातूनच रोजगाराची प्राप्ती झाली आहे. शासनाच्या उमेद प्रकल्पांतर्गत तेजस्विनी ग्रामसेवा संघाच्या अध्यक्ष रंजना दीपक वाढोणकर यांच्यासह किरण मुनकर, सुवर्णा खैरकर, शोभा टेकाम, प्रतीभा उईके, वंदना कन्नाके व सविता भस्मे यांनी यवतमाळ येथून प्रशिक्षण घेतले. यानंतर संघामार्फत रोठा येथेच हा व्यवसाय सुरू करण्यात आला. यासाठी एक खोली भाडेतत्वावर घेण्यात आली असून त्यात कच्चा माल ठेवण्यात आला आहे. याच खोलीत ग्रामसेवा संघाच्या महिला ट्रेडल पंपांची निर्मिती करतात. यवतमाळ येथून येणाऱ्या कच्च्या मालाला असेम्बल करून पंप तयार केला जातो. तो शेतकऱ्यांना पाईपसह उपलब्ध करून दिला जातो.
रोठा येथे १ नोव्हेंबर २०१७ रोजी या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. पाच महिन्यांमध्ये ग्रामसेवा संघाने ९१ ट्रेडल पंप तयार केलेत. यातील ७२ पंपांची शेतकºयांना विक्री करण्यात आलेली आहे. एक पंप तयार करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. एका पंपाच्या विक्रीनंतर संघाला ५०० रुपये मिळतात. यातील ३०० रुपये महिलांच्या वाट्याला येतात. महिलांद्वारे निर्मित या ट्रेडल पंपाचे मार्केटींग शासनाच्या उमेद प्रकल्पाद्वारे तथा यवतमाळ येथील संबंधित कंपनीकडून केले जात आहे. याद्वारे प्राप्त मागणीनुसार पंपांची निर्मिती केली जाते. या पाणी पंपांतून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. असे असले तरी श्रमावर चालणाऱ्या या पंपाच्या मार्केटींगसाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे.
पंपाची देखभाल करणेही सोपेच
ट्रेडल पंपाची देखभाल, दुरूस्ती करणेही सोपे आहे. हा पंप वापरण्यास सुलभ आहे. मशिनमध्ये बिघाड झाल्यास स्वत: दुरूस्ती करता येते. वजन कमी असल्याने स्थलांतर करणे सोपे जाते. प्रत्येक ४-५ दिवसांनी पंपाचे आॅईलिंग केल्यास पायडल मारण्यासही हलके जाते.
ट्रेडल पंप शेतकऱ्यांना किफायतशीर
तेजस्विनी ग्रामसेवा संघातील महिलांद्वारे निर्मित ट्रेडल पंप शेतकºयांना किफायतशीर आहे. केवळ ४ हजार ९५० रुपयांमध्ये हा पंप उपलब्ध होत असून एक वर्षाची वॉरंटीही दिली जाते. यासोबत ठिबक सिंचनाची सोय करायची झाल्यास गुंठ्यांप्रमाणे पाईप उपलब्ध करून दिले जातात. वीज नसतानाही शेतातील ओलित थांबत नसल्याने हे पंप शेतकºयांना लाभदायी ठरत आहेत.
पंपाचे फायदे
कमी पाणी असतानाही या पंपाद्वारे ओलित करणे शक्य आहे. डिझेल वा विद्युत प्रवाहावर अवलंबून राहावे लागत नाही. वाटेल तेव्हा पिकांना पाणी देता येते. ६ ते ८ मिनिटांमध्ये २०० लिटर पाणी सहज बाहेर काढले जाते. पाण्याची बचत होत असून उपसा कमी होतो. पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होते. पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे शक्य होत असून सुक्ष्म अन्नद्रव्य देता येते. पिकांची वाढ जोमाने होत असून तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाणी विद्राव्य खतेही यातून वापरली जाऊ शकतात.

Web Title: 'Trade Waters Pump' gave 240 jobs to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.