रामनवमीच्या फुगडी कार्यक्रमाला दीड शतकाची परंपरा
By admin | Published: April 2, 2015 01:58 AM2015-04-02T01:58:15+5:302015-04-02T01:58:15+5:30
रामनवमी उत्सवानिमित्त स्थानिक बोरतीर्थावर बुधवारपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले़ यातील शेवटच्या दिवशी ...
घोराड : रामनवमी उत्सवानिमित्त स्थानिक बोरतीर्थावर बुधवारपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले़ यातील शेवटच्या दिवशी होणाऱ्या फुगडी या कार्यक्रमाला तब्बल दीड शतकाची परंपरा लाभली आहे़ यंदाचा रामनवमी उत्सवही बुधवारी पार पडलेल्या महिलांच्या फुगडीने उत्सवाची सांगता करण्यात आली.
विठ्ठल-रूखमाई देवस्थानात हा कार्यक्रम घेण्यात आला़ गोविंद बोलो, गोपाल बोलो, राधे कृष्ण, गोपाल कृष्ण या भजनाच्या व टाळ मृदंगाच्या निनादात चार तास फुगडी कार्यक्रम चालला़ बालगोपालांसह युवक, युवती, वयोवृद्ध महिला, पुरूषांनी यात सहभागी होऊन आनंद द्विगुणित केला. फुगडी खेळण्यासाठी आतूर व पाहण्यासाठी उत्सुक भाविकांची मंदिराच्या सभागृहात गर्दी झाली होती़
हा कार्यक्रम दरवर्षी येथे होत असून याला संतांची परंपरा लाभली आहे़ दीडशे वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरू आहे. रामनवमी उत्सवानिमित्त रामजन्मोत्सव, काला व कीर्तन, दहीहांडी कार्यक्रम, हनुमंताच्या मूर्तीची रथयात्रा, असे विविध धार्मिक कार्यक्रम येथे शांततेत पार पडले़ रामनवमी उत्सवानिमित्त गावात यात्राही भरली होती़ चिमुकल्यांना खेळण्यासाठी आकाश पाळणे व अन्य मनोरंजनात्मक साहित्य दाखल झाले होते़(वार्ताहर)