वर्धा जिल्ह्यातील परंपरा असलेली पंचक्रोशी प्रदक्षिणा कोरोनाच्या सावटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 11:41 AM2020-06-19T11:41:25+5:302020-06-19T11:41:54+5:30
तीन महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडले जावे म्हणून आता भाविक उघड दार देवा आता अशी आर्त हाक देवाला देत कोरोना संकट दूर सरो असे साकडे घालत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: विदर्भाची प्रती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थ घोराड येथे आषाढी एकादशीला निघणारी पंचक्रोशी प्रदक्षिणा ही कोरोनाच्या सावटत सापडली आहे. त्यामुळे पावणे दोनशे वर्षांची धार्मिक परंपरा खंडित होणार काय याकडे लक्ष लागले आहे.
आषाढी एकादशी या दिवशी घोराड पंचक्रोशी प्रदक्षिणा ही महत्त्वाची मानली जाते. संत केजाजी महाराज यांनी केलेली सुरूवात ही त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनी चालू ठेवली. नंतर ही परंपरा गावातील विठ्ठल भक्तांनी सुरू ठेवली आहे. आषाढी एकादशीला दुपारी मंदिरातून ही प्रदक्षिणा निघते तेव्हा बोर नदी तीरावरून जगदंबा मंदिर, संत नामदेव महाराज समाधी व तदनंतर शेतातून जाऊन हिंगणी रस्त्यावर तेथून श्री कृष्ण मंदिर पुन्हा शेतातील वाटेने माता मंदिर अशी ही प्रदक्षिणा असते. यात गावातील भाविकांसह शेतकरी सामील होतात. जवळपास ही प्रदक्षिणा दोन कि.मी अंतर असणारी असते. यात गावातील भजनी मंडळी व महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर राहतात.
पण दिनांक ३० जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन व १ जुलै ला असणारी आषाढी एकादशी पाहता यावर प्रश्न चिन्ह लागते आहे. मंदिराचे दरवाजे एकादशीला उघडणार काय हे महत्त्वाचे आहे. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही असे माऊलीचे भक्त प्रती पंढरीत या परिसरातील भाविक विठू माऊलीचे दर्शन घेतात.
उघड दार देवा आता
गत तीन महिन्यांपासून मंदिराचे दरवाजे बंद आहे आता कुठे कमीत कमी मंदिराच्या पायरीपर्यंत जाऊन माथा टेकवून समाधान लाभत आहे. याच लॉक डाऊन मध्ये राम नवमी, हनुमान जयंती उत्सव आले. त्यातच आषाढी एकादशी येत आहे. तीन महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडले जावे म्हणून आता भाविक उघड दार देवा आता अशी आर्त हाक देवाला देत कोरोना संकट दूर सरो असे साकडे घालत आहेत.