जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात
By admin | Published: February 4, 2017 12:20 AM2017-02-04T00:20:56+5:302017-02-04T00:20:56+5:30
येथील गिरड मार्गावर टी पॉर्इंटवर रात्रीच्या सुमारास जनावरे घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.
कोरा-गिरड टी पॉर्इंटवरील घटना : नऊ जनावरांचा मृत्यू; तीन गंभीर
कोरा : येथील गिरड मार्गावर टी पॉर्इंटवर रात्रीच्या सुमारास जनावरे घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात नऊ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
कोरा-चिमूर मार्गावरून रात्रीच्या सुमारास कत्तलखान्याकडे जनावरे नेणाऱ्या ट्रकला कोरा -गिरड टी पॉर्इंटवर अपघात झाला. या अपघातग्रस्त ट्रकची पाहणी केली असता यात तब्बल २२ जनावरांची कोंबून वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे. अपघातादरम्यान चौकशी केली असता यातील नऊ जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तर तीन जनावरे गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले आहे. या मृत जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
रात्रीच्या सुमारास जात असलेल्या एनएल-०२ एन-६८१३ क्रमांकाच्या ट्रक चालकाचे संतुलन गेल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात होताच ट्रक चालक आणि वाहकाने घटनास्थळाहून पळ काढला. ट्रकमधील उर्वरीत जनावरांना गवते महाराज यांच्या पावणगाव गोशाळेत पाठविण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन केले असून जनावरांचा दफनविधी करण्यात आला. वृत्तालिहेपर्यंत चालकाचा तपास लागला नव्हता. अधिक तपास गिरड पोलीस करीत आहे.(वार्ताहर)