रस्त्यांवरील मालवाहूंमुळे वाहतूक प्रभावित

By admin | Published: March 17, 2016 02:45 AM2016-03-17T02:45:05+5:302016-03-17T02:45:05+5:30

शहरातील मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात.

Traffic affected due to the freight on the roads | रस्त्यांवरील मालवाहूंमुळे वाहतूक प्रभावित

रस्त्यांवरील मालवाहूंमुळे वाहतूक प्रभावित

Next

नागरिक त्रस्त : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप
वर्धा : शहरातील मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात. परिणामी चौकाचौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे.
मार्केट परिसरात कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहने ठेवताना नेहमीच अडचणी येतात. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांपुढे नेहमीच दुचाकी वाहनांची गर्दी असते. त्यातच लहान-लहान मालवाहू वाहने या दुकानांमध्ये माल उतरविण्यासाठी दिवस दिवस वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापला जातो. तसेच माल दुकानांमध्ये उतरविण्याचा प्रकार अनेक दुकानांमध्ये दिवस भर सुरू असतो. मंगळवारी सोशालिस्ट चौकात असलेल्या दुकानांसमोर दुपारी माल उतरवित असलेल्या वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे बराच वेळ येथे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नागरिक संताप व्यक्त करीत होते.
दुकानांपुढे असलेल्या मोकळ्या जागेत ही वाहने उभी करून माल उतरविणे खरे तर गरजेचे आहे. पण अत्यल्प असलेल्या जागेतील अर्ध्या भागात आधीच दुकानांनी अतिक्रमण केले आहे. उरलेल्या जागेवर ग्राहकांची आणि दुकान मालकासह काम करीत असलेल्या कर्मचारी वर्गाची वाहने उभी असतात. त्यामुळे मालवाहू वाहनांना रस्त्यावर वाहने उभी करूनच माल उतरवावा लागतो.
एखाद्या दुकानापुढे मोकळी जागा असली तरीही वाहनचालक सोयीच्या दृष्टीने रस्त्यावरच गाडी उभी करतो. वाहतुकीवर काय परिणाम होत आहे याचा विचारच केला जात आहे. हा प्रकार शहरात नित्याचाच झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही समस्याही नवीन राहिलेली नसली तरी त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
अश्या प्रकारे रस्त्यावर उभ्या मोठ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच दुकानदारांसोबत बोलून सकाळी लवकर माल उतरवून घेण्यासंबंधी त्यांना सुचविणे गरजेचे आहे. आपली वाहने कमी कमी रस्त्यावर येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण मालवाहू वाहनचालकांकडून याची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. दुपारी मुख्य मार्गावर जास्त वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची शक्यता ही बळावली असून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Traffic affected due to the freight on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.