बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक विस्कळीत
By admin | Published: September 22, 2016 01:14 AM2016-09-22T01:14:59+5:302016-09-22T01:14:59+5:30
येथील मेडिकल चौकात वाहनचालकांचा नेहमीच बेशिस्तपणा अनुभवास येतो.
अपघातात वाढ : वाहतूक पोलिसांची गरज
सेवाग्राम : येथील मेडिकल चौकात वाहनचालकांचा नेहमीच बेशिस्तपणा अनुभवास येतो. याचा त्रास मात्र इतर नागरिक व प्रवाशांना सोसावा लागतो. त्यामुळे या चौकात वाहतूक पोलीस निरीक्षकाची नेमणूक करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
मेडिकल चौक हा सदैव गजबजलेला असतो. प्रवासी व रुग्णांची हे सारखी वर्दळ असते. याच चौकातून कांढळी, जाम, महात्मा गांधी आश्रम, पवनार आणि वर्धेकडे मार्ग जातात. कांढळी आणि महात्मा गांधी आश्रमकडे जाणारा रस्ता हा वळणदार आहे. मेडिकल चौक ते वरूड रेल्वे फाट्यापर्यंत दुभाजक बसविण्यात आले आहेत. पण या चौकात सुसाट धावणारी आणि नियमांचे उल्लंघन करणारी वाहने अपघात करतात. यामुळे चौकात सदैव भीतीचे वातावरण असते.
मुख्य मार्गावर वाहने थांबवून चर्चा करीत बसणाऱ्यांची संख्याही कमी नाही. सायंकाळी चौकात गर्दी उसळते. इतर प्रवाशांची पर्वा न करता दुचाकीस्वार भर रस्त्यावरच वाहने आदवी करीत उभी असतात. यामुळे इतर वाहनचालक व प्रवाशांना त्रास सोसावा लागतो. काहीच दिवसांपूर्वी या चौकात झालेल्या अपघातामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे चौकातील बेशिस्तीला आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिसांची येथे नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून वारंवार केली जात आहे.(वार्ताहर)