अल्पवयीन वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली
By admin | Published: March 20, 2017 12:45 AM2017-03-20T00:45:21+5:302017-03-20T00:45:21+5:30
शहर व आजुबाजूच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मोठ्या अपघाताची भीती : पोलिसांकरवी प्रभावी कारवाईची गरज
वर्धा : शहर व आजुबाजूच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी आपल्या पाल्यांचे लाड पुरविण्यासाठी वाहने घेऊन दिली आहेत. परंतु, या नवख्या वाहनचालकांपैकी अनेकांनी आपल्या वयाची १८ वर्षेही पूर्ण केली नसल्याचे बघावयास मिळते. त्यांच्याकडून दररोज वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात आहे. सदर प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा असल्याने वाहतूक पोलिसांकरवी प्रभावी कार्यवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील वाहतुकीला पूर्वीच शिस्त नाही. अनेक ठिकाणी केवळ वन-वे वाहतुकीचे फलक शिल्लक आहे. जे मार्ग वन-वे करण्यात आली. त्या मार्गावरून सर्रासपणे दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच अल्पवयीन वाहनचालक आपल्या ताब्यातील वाहन सुसाट पळवित असल्याने व हा प्रकार शहरातील मुख्य मार्गावरही होत असल्याने सुजान नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वी पाल्याला शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीत ये-जा करण्यासाठी सायकल घेऊन दिली जात होती. परंतु, आता पालकच पाल्याच्या लाड पूर्ण करण्यासाठी दुचाकी वाहने घेऊन देताना दिसतात. परिणामी, दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे व वाहनांमध्ये लावण्यात आलेल्या कर्कश हॉर्नमुळे दिवसेंदिवस वायु व ध्वनी प्रदुषणात वाढ होत आहे. ही बाब पर्यावणाच्या दृष्टीने धोक्याची असल्याने याकडे पालकांनीही जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)