एमपीतून गांजा आणणारा तस्कर ‘प्यारे खाँ’ अटकेत; १.७८४ किलोग्रॅम गांजा जप्त
By चैतन्य जोशी | Published: October 11, 2023 05:33 PM2023-10-11T17:33:34+5:302023-10-11T17:34:19+5:30
गुन्हे शाखेची कारवाई
वर्धा : मध्यप्रदेशातून गांजा आणत वर्ध्यात विक्री करणाऱ्या गांजा तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने १० रोजी रात्रीच्या सुमारास बोरगाव मेघे परिसरातील गिट्टीखदान येथून बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सावंगी पोलिसात ११ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. प्यारे खाँ मेहबुब खाँ पठाण (५९) रा. गिट्टीखदान बोरगाव मेघे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सावंगी हद्दीत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास आरोपीच्या निवासस्थानी छापा मारला असता घर तपासणीत प्लास्टीकच्या पिशवीत ३४ हजार रुपये किंमतीचा १ किलो ७८४ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईलही जप्त करुन बेड्या ठोकल्या. त्याला गांजाबाबत विचारपूस केली असता प्यारे खाँ याने मध्यप्रदेश येथील खंडवा रेल्वेस्थानक परिसरातील रहिवासी मोहम्मद रेहमान याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती दिली. त्याच्याविरुद्ध सावंगी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक राम खोत, संतोष दरगुडे, मनोज धात्रक, हमीद शेख, श्रीकांत खडसे, चंद्रकांत बुरंगे, नरेंद्र पाराशर, विकास अवचट, संजय बोगा, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे, विनोद कापसे यांनी केली.