वाहतूक पोलीस चौकीचे स्थानांतरण करा
By admin | Published: March 14, 2016 02:14 AM2016-03-14T02:14:06+5:302016-03-14T02:14:06+5:30
जाम चौरस्ता येथे वाहतूक पोलीस मदत चौकी आहे. याच ठिकाणी वाहन तपासणी केली जाते.
जाम ग्रा.पं.चे तहसीलदारांना साकडे
समुद्रपूर : जाम चौरस्ता येथे वाहतूक पोलीस मदत चौकी आहे. याच ठिकाणी वाहन तपासणी केली जाते. दरम्यान, गर्दी होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, सदर चौकी गावाबाहेर स्थापन करावी. वाहनांची तपासणीही तेथेच करण्यात यावी, अशी मागणी जाम ग्रामपंचायत व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत नायब तहसीलदार सुरेंद्र दांडेकर यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे.
हैद्राबाद - नागपूर महामार्ग क्र. ७ वर वाहतूक नियंत्रण व अपघातग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने २० वर्षांपूर्वी गावाबाहेर नागपूर रोडवर वाहतूक पोलीस मदत चौकी उभारण्यात आली होती. आज त्या चौकीच्या सभोवताल मोठी गाववस्ती तयार झाली. बाजूलाच इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शाळा आहे. सदर चौकीसमोर वाहन तपासणी सुरू असते. यावेळी कधी वाहने थांबत नाही वा वाहनाच्या समोर कठडे ओढले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोबत शाळेच्या मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे सदर चौकी गावाच्या बाहेर नेऊन वाहनाची तपासणी करावी, अशी मागणी जाम ग्रा.पं.चे उपसरपंचांनी चौकीतील अधिकाऱ्यांना केली होती; पण वरिष्ठांच्या आदेशानुसार दररोज किमान ४० केसेस करणे आवश्यक असल्याने त्यांनी ही मागणी अमान्य केली.
यामुळे जाम ग्रा.पं. प्रशासन व बजरंग दलाने ही चौकी गावाबाहेर हटविण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. चौकी हटविण्यात आली नाही तर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी वर्धा, आमदार समीर कुणावार यांनाही पाठविण्यात आल्या. निवेदन देताना ग्रा.पं. उपसरपंच सचिन गावंडे, चांगदेव राऊत, बजरंग दलाचे सनी निवटे, साईनाथ भगत, प्रमोद चौखे, सुरेश उरकुडे, सागर निखाडे, अजय खेडेकर, पंकज लाटकर, अभिलाष गिरडकर, संजय कोरडे, विकास झाडे, सुरज कलोडे, चेतन हिवरकर, गणेश पोटे, कोळसे, मडावी यांच्यासह ग्रामस्थ, ग्रा.पं. सदस्य व बजरंग दल पदाधिकारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधीे)