पारोधीत पाणी पेटले
By admin | Published: March 4, 2017 12:36 AM2017-03-04T00:36:26+5:302017-03-04T00:36:26+5:30
उन्हाळा येताच पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. याचे चटके तालुक्यातील पारोधी गावातील नागरिकांना बसत आहे.
महिलांची तहसीलला धडक : हातपंपांवरील अतिक्रमण काढा
समुद्रपूर : उन्हाळा येताच पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. याचे चटके तालुक्यातील पारोधी गावातील नागरिकांना बसत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता गावातील हातपंपाचे खोलीकरण करण्याकरिता मशीन आली असता येथील पंचायत समितीच्या माजी सदस्याने जागा मालकीची असल्याचे सांगत परत पाठविली. यामुळे संतपालेल्या महिलांनी शुक्रवारी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पोलीस ठाणे गाठत सदर अतिक्रमण काढून नागरिकांना पाणी देण्याची मागणी केली.
तालुक्यातील ग्रामपंचायत लाहोरी अंतर्गत पारोधी, धुमनखेडा येथे मागील २५-३० वर्षांपासून तीव्र पाणी टंचाई असते. पारोधी येथे २५ वर्षांपूर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य बाबाराव थुटे यांच्या घरासमोर हातपंप लावण्यात आला होता. त्या हातपंपावर गावकरी पाणी भरत असे. मात्र गत २-३ वर्षांपूर्वी हातपंपात बिघाड आला आणि तो बंद झाला. दरम्यान सन २०१५-१६ मध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने गावात नवा हातपंप मंजूर झाला. यात जुन्याच हातपंपाच्या बाजूला बोर करण्याकरिता मशीन आली असता थुटे यांनी मशीन परत पाठविली. यामुळे दुसऱ्या जागेवर हातपंप लावण्यात आला. मात्र येथे पाण्याचे स्त्रोत नसल्याने फारच कमी पाणी लागले. आता हा हातपंप कोरडा पडला. या वर्षी आतापासून पाणी टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हातपंपाचे खोलीकरण करण्यासाठी मशीन बोलावली असता थुटे यांनी ती पुन्हा परत पाठविली. शिवाय येथे कसे बोर करता मी पाहतो, अशी धमकीही दिल्याचे संतप्त महिलांचे म्हणणे आहे.
यामुळे लाहोरी ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता गेडाम, उपसरपंच महादेव बादले यांच्या नेतृत्वात संतप्त महिला पुरूषांनी तहसीलदार दीपक कारंडे, गटविकास अधिकारी विजय लेंढे, ठाणेदार प्रवीण मुंडे यांना मोर्चाद्वारे निवेदन देत थुटे यांचे अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी केली. मोर्च्यात लक्ष्मी अवलेनकर, विजया ढाकणे, चंद्रकला चतुर, सारिका राऊत, वंदना महाकाळकर, शालू डंभारे, मीरा झाडे, विमल दाते, शकुंतला आडकिने, माधुरी लोणले, मनीषा डंभारे, वर्षा चतुर, सुनिता तांदुळकर, मंदा जामुनकर, उषा लोणारे, सरला ठसे, कविता शिंदे, शारदा येंडे, वत्सला थुटे, चंद्रकला डंभारे, नारायण बादले, वसंता थुटे, धर्मा मेंढे यांच्यासक महिला उपस्थित होत्या.(तालुका प्रतिनिधी)